सोलापूर : येथील माझी नायब तहसीलदार मोहन बेंजामिन उर्फ भालचंद्र आंग्रे यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले ते ७५ वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. आंग्रे यांच्यावर ख्रिश्चन स्मशानभूमी काल दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोहन आंग्रे यांनी अन्नधान्य पुरवठा विभागात काम करत असताना त्यांना नायब तहसीलदार पदावर बढती मिळाली होती. आणि नायब तहसीलदार म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते.त्यांनी अनेक नाटकात भूमिका केल्या होत्या. अनेक संगीत नाटकांचे दिग्दर्शनही त्यांच्याकडून झाले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखेचे ते कार्यकारिणी सदस्य आणि मसाप सोलापूर शाखेचे ते सदस्य होते. मोहन आंग्रे यांच्या जाण्याने एक हरहुन्नरी कलावंत हरपल्याची भावना सोलापूरच्या नाट्य वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
एक दिलखुलास मित्र हरपला
मागील पन्नास वर्षापासून ज्याच्या मैत्रीच्या सहवासात कलेचा आनंद घेत असताना एक अलौकिक आनंद स्पर्श करून गेला,असा माझा मित्र मोहन आंग्रे आज काळाच्या पडद्याआड गेला, याचे दुःख अत्यंत अनावर झाले आहे. मागील पन्नास वर्षात मोहन आंग्रे यांच्यातील कलागुणांना मी पाहत आलो आहे. अभिनयाची,गायनाची,संगीताची उत्तम जाण असलेला आणि स्पष्टवक्तेपणा असलेल्या मोहन आंग्रे यांचे सोलापूरच्या रंगभूमीवरील योगदान न विसरण्यासारखे आहे. आज त्याच्या जाण्याने अंतकरण अत्यंत दुखी झाले. आज मी माझ्या या बहुगुणी मित्राला अंतकरणापासून श्रद्धांजली वाहत आहे. अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी व्यक्त केली.