मुंबई : जगभरात कोरोनानं लाखो लोकांचा जीव घेतल्यानंतर आता देशातील विविध राज्यांमध्ये हजारो पक्ष्यांच्या मृत्यूच्या बातम्या येण्यास सुरुवात झाली आहे. या मृत्यू कशामुळे होत आहेत, हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, पक्ष्यांमध्येही कुठलातरी भयाणक विषाणू तर पसरत नाही ना या गोष्टींची शंका येण्यास सुरुवात झाली आहे. कारण, हजारो किलोमीटर दूरवरुन भारतात येणाऱ्या प्रवासी पक्ष्यांच्यामृत्यूचं यामध्ये सर्वात मोठं प्रमाण आहे. शिवाय इंदूरमध्ये 2 मृत कावळ्यांमध्ये ‘H5N8’ हा विषाणू आढळल्यानं पक्ष्यांमधील विषाणू संसर्गाची (virus spread) शक्यता अधिक ठळक होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता विविध राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे
इंदूरमध्ये मृत कावळ्यांमध्ये आढळला विषाणू
मध्य प्रदेशात एका खासगी कॉलेजच्या परिसरात तब्बल 100 हुन अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्या कावळ्यांची तपासणी करण्यात आली, तेव्हा यातील 2 कावळ्यांमध्ये ‘एच-5 एन-8’ विषाणू आढळला आहे. विषाणू आढळल्यानंतर मध्य प्रदेशच्या पशूसंवर्धन विभाग सक्रीय झाला आहे. आणि त्यानंतर विविध स्तरावर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य प्रदेशात यापुढं मृत पक्ष्यांची तपासणी केली जाणार आहे.
हिमाचल प्रदेशातही हजारो पक्ष्यांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशात तब्बल 1 हजार 500 हुन अधिक प्रवाशी पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. इथल्या पोंग डॅम या परिसरात पक्ष्यांच्या मृत्यूची माहिती आहे. या घटनेनंतर कांगडा जिल्हा प्रशासनाकडून या जलाशय परिसरातल्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय पक्ष्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विशेष तपासणीवर भर दिला जाणार आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या पक्ष्यांच्या रक्ताचे नमूने भोपाळच्या हाय सिक्युरिटी अॅनिमल डिजीज लॅबला पाठवण्यात आले आहेत.
राजस्थानातही पक्ष्यांच्या मृत्यूचं सत्र सुरु
राजस्थानातही पक्ष्यांच्या मृत्यूचं सत्र थांबताना दिसत नाही. जयपूरसह 7 जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 135 हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राजस्थान सरकारनं राज्यात हायअलर्ट जारी केला आहे. शिवाय पक्ष्यांच्या मृत्यूवर लक्ष्य ठेवण्यासाठी एक कंट्रोल रुमही तयार करण्यात आली आहे. शिवाय जिथं या कावळ्यांचा मृत्यू होत आहे, तिथे तज्ज्ञांची एक समितीही पाठवण्यात आली आहे. सांभर तलावातही काही दिवसांपूर्वी हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा पक्ष्यांच्या मृत्यूचं सत्र सुरु झालं आहे.
गुजरातच्या जुनागढमध्येही पक्ष्यांचा मृत्यू
गुजरातच्या जुनागढच्या एका गावाही आतापर्यंत 53 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन जागं झालं आहे. आणि पक्ष्यांच्या मृत्यूकडे बारकाईनं लक्ष्य ठेवलं जात आहे. इथल्या बाटला गावात एकाच दिवसांत 53 पक्षी मृतावस्थेत सापडले होते.