येस न्युज मराठी नेटवर्क : भारतात लवकरच करोना लसीकरण सुरू होत आहे. आम्हाला देशातील वैज्ञानिकांचा अभिमान आहे. नव्या वर्षात भारतात दोन लसींना परवानगी मिळाली, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानावर जोर दिला. राष्ट्रीय हवामान परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना मोदींनी वस्तू व सेवांच्या गुणवत्तेवर भर देण्याचं आवाहन केलं.
राष्ट्रीय हवामान परिषदेबरोबरच पंतप्रधानांनी राष्ट्रीय पर्यावरणीय गुणवत्ता प्रयोगशाळेचं भूमिपूजन केलं. यावेळी मोदींनी व्होकल फॉर लोकलचा नारा देत भारतीय वस्तू जगातील बाजारापर्यंत नेण्याचं आवाहन केलं. आत्मनिर्भर भारताचा उल्लेख करत पंतप्रधानांनी नवे परिमाण निश्चित करण्याचं आवाहन केलं.
पंतप्रधान मोदी म्हणाले,”दोन लसींना परवानगी देण्यात आली असून, देशात लवकरच करोना लसीकरणाला सुरूवात होत आहे. देशातील सेवा गुणवत्तापूर्ण असायला हव्यात. मग ते क्षेत्र सरकारी असो वा खासगी. वस्तू दर्जेदार हव्यात. आपली गुणवत्ता परिमाण हे निश्चित करणार आहे की, भारतीय बनावटीच्या वस्तूंची जगात किती मागणी वाढली आहे,” असं मोदी म्हणाले.