मुंबई : नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईमध्ये तीन कोटी ७५ लाख रुपयांचं ऑफिस खरेदी केलं आहे. लिंकिंग रोडवर हे नवीन कार्यालय आहे. सहाव्या मजल्यावर उर्मिलाचं ऑफिस आहे. रिपोर्ट्सनुसार उर्मिला यांचं हे नवीन ऑफिस १००० स्क्वेअर फूटमध्ये विस्तारलेलं आहे. खार वेस्ट येथे लिंकिंग रोडवर उर्मिलानं आपलं नवीन ऑफिस विकत घेतलं आहे. या इमारतीतील ऑफिसचं प्रतिमहिन्याचं भाडं जवळपास पाच लाख रुपयांचं असल्याची चर्चा आहे.
सकाळपासून प्रसारमाध्यामात यावर विविध चर्चा सुरु झाल्या.. त्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे. यामध्ये त्या म्हणाल्या की, ‘मी ऑफिस घेतलं हे खरं आहे. मात्र प्रसारमाध्यमांनी फक्त अर्ध सत्य छापलं. मार्च २०२० मध्ये अंधेरी डी.एन. नगर येथे असणारा माझा एक फ्लॅट मी विकला होता. या पैशातून मला खरेदी करायची होती. मात्र लॉकडाउनमुळे सर्व नियोजनावर पाणी फिरलं. आता त्याच पैशांमधून नवीन कार्यालय विकत घेतलं आहे. सर्व कागदपत्रं त्याच रजिस्टेन कार्यालयात उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी बातम्या देताना व्यवस्थित द्याव्यात. आतापर्यंत प्रत्येक व्यवहाराचे सर्व कागदपत्रं आणि पुरावे आहेत. मला तोडण्याचा प्रयत्न करु नका…’