रत्नागिरी : निवडणूक मग ती कोणतीही असो. यावेळी महत्त्व असते ते निवडणूक आयोगाकडून दिल्या जाणाऱ्या चिन्हाला. प्रत्येक उमेदवार पक्षाचं चिन्ह नसेल तर आपल्या पसंतीचं चिन्ह मिळावं यासाठी धडपडत असतो. अनेक वेळा काही मजेशीर चिन्हं चर्चेचा विषय देखील ठरतात. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत देखील अशाच प्रकारे सध्या चिन्हांबाबत चर्चा होताना दिसत आहे. महत्वाचं म्हणजे अगदी पाव, ब्रेड, सफरचंद, भाज्या, नेलकटर, कंगवा अशा एक ना अनेक मजेशीर चिन्हांचा यामध्ये समावेश आहे. जवळपास 190 चिन्हं निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आली आहेत. त्यामुळे सध्या या निवडणुकीपेक्षा चिन्हांचीच चर्चा जोरात होताना दिसत आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात 479 ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. दरम्यान, 3921 जागांसाठी 7203 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. 4 जानेवारीपर्यंत उमेदवाराला आपला अर्ज मागे घेता येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं जारी केलेल्या चिन्हांच्या यादीपैकी 190 निवडणूक चिन्हांचा पर्याय उमेदवारासमोर असून यामधून उमेदवाराला आपलं आवडीचं चिन्हं निवडावं लागणार आहे. ही सारी बाब लक्षात घेता आता कुणाला कोणतं चिन्हं मिळणार किंवा कोण कोणतं चिन्हं घेत प्रचार करणार याबाबतची उत्सुकता लागली आहे. पण, सध्या नाक्यानाक्यांवर याचाची चर्चा रंगली आहे.