सोलापूर, दि. 30 डिसेंबर :प्रत्येक मनुष्याला आपल्या जन्मात चांगल्या गोष्टी करण्यासाठी भाग्य लागते. तसेच भाग्य आपल्या जन्मात आले आहे. अयोध्येमध्ये भगवान श्री प्रभू रामचंद्राचे मंदिर उभारणीचे काम सुरू झाले आहे. या मंदिर निर्माणाच्या कार्यात आपल्याला सहभागी होता येत आहे हे आपले अहो भाग्यच आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी केले.
सोलापूरच्या शिवस्मारकाच्या आवारात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र निधी समर्पण कार्यालयाचे उद्घाटन ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांच्या हस्ते प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करून आणि नारळ वाढवून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र निधी संकलन समितीचे विभाग संयोजक सतीश अरगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला.
पुढे बोलताना ह.भ.प. इंगळे महाराज म्हणाले, मनुष्य जन्मात अनेक गोष्टी करता येण्यासारख्या असतात. त्यासाठी संधी मिळावी लागते. अशी संधी आपल्याला आता मिळाली आहे. आपण सर्वजणांना प्रत्यक्षात निधी देता आला नाही तरी शारीरीक कष्टाने या कार्यात सहभागी होता येत आहे हेही भाग्यच आहे. अलिकडे समाजासाठी, धर्मासाठी काही काम करण्याची धारणा कमी होत आहे. मात्र आपण सर्वजण या कार्यात सहभागी होत आहोत. आपल्याला या कामात खारीचा वाटा उचलावयाचा आहे. ज्यांना प्रत्यक्ष येऊन निधी देणे शक्य नाही त्यांच्या घरापर्यंत आपल्याला जावे लागणार आहे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावे लागेल. त्यासाठीचे नियोजन झाले आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी केले.
यावेळी बोलताना ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण म्हणाले, संपूर्ण देशभरातून राम मंदिर निर्माणाबाबत उत्साह निर्माण झाला आहे. राम मंदिर हे राष्ट्राचे प्रतिक आहे, अशी सर्व देशवासियांमधून आणि जगामधून भावना निर्माण झाली आहे. या मंदिराच्या निर्माणात आपलाही खारीचा वाटा असला पाहिजे या भावनेतून आपण सर्वांनी मिळून हे काम करू यात. यामध्ये देशभरातील 130 जनतेचा सहभाग घेऊन हे मंदिर निर्माणाचे कार्य पूर्ण करावयाचे आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या निधी संकलन समितीचे जिल्हा सहसंयोजक प्रा. नवराज काळदाते यांनी सूत्रसंचालन, प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी राम जन्मभूमी निधी संकलन अभियानाची भूमिका मांडली. निधी संकलन अभियानाचे प्रमुख विठ्ठल कदम यांनी आभार मानले.
रा.स्व. संघाचे शहर संघचालक राजेंद्र काटवे, जिल्हा कार्यवाह संतोष कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत, शिवस्मारकचे दामोदर दरगड, या निधी संकलन अभियानाचे प्रमुख विठ्ठल कदम, सहप्रमुख नरेंद्र काळे, यांच्यासह विश्व हिंदू परिषद, विविध हिंदूत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी तीन लाखाची निधी
या कार्यालयाच्या उद्घाटना दिवशीच दिनेश जाजू, आयएमपी रियॅलिटीचे संजय पटेल आणि विनय कन्स्ट्रक्शनचे चंद्रशेखर अक्कलकोटे यांनी प्रत्येकी एक लाख रूपयांचा निधी दिला. त्यामुळे पहिल्याच दिवशी तीन लाखाचा निधी जमा झाला.