येस न्युज मराठी नेटवर्क : गेल्या काही दिवसांपासून मुंबईबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कंगना राणावत आणि शिवसेना असा सामना रंगला होता. हा वाद आता शमला असतानाच कंगना पुन्हा एकदा मुंबईत परतली आहे. तर, मुंबईत येताच तिनं पुन्हा एकदा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
मुंबईत परतताच कंगनानं सिद्धिविनायक व मुंबा देवीचे दर्शन घेतले. यावेळ कंगना हिरवी साडी, नाकात नथ व केसात गजरा अशा पारंपारिक मराठमोळ्या वेषात दर्शनासाठी आली होती. तसंच, प्रसार माध्यमांशी संवाद साधताना तिनं शिवसेनेवरही अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाहीये, असं म्हणत कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नीला आलेल्या ईडीच्या नोटीसविषयी कंगनाला प्रश्न विचारला असताना तिनं यावर उत्तर देणं टाळलं आहे.
मुंबा देवी आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर इथं सुरक्षित वाटत असल्याचं ट्विट कंगनानं केलं आहे. तसंच, जय हिंद व जय महाराष्ट्र असा नाराही दिला आहे.