येस न्युज मराठी नेटवर्क : मोदी सरकारने शेतकऱ्यांना फसवलं आहे या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो असं म्हणत पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार परत केला आहे. केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे जाचक आहेत. शेतकऱ्यांसाठी घातक आहेत. या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी घेणंदेणं नाही या गोष्टींचा निषेध करत मी मला मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे असंही प्रकाश सिंह बादल यांनी म्हटलं आहे. अकाली दलाने कृषी कायद्यांचा निषेध नोंदवतच एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता केंद्र सरकारवर टीका करत प्रकाश सिंह बादल यांनी त्यांचा पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
कृषी कायद्यांचा निषेध नोंदवत सध्या पंजाब, हरयाणामधल्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधात आंदोलन पुकारलं आहे. हे कायदे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोमवारी तर निषेध म्हणून मोदी सरकारचा प्रतीकात्मक पुतळाही जाळण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांना चर्चेचं निमंत्रण देत सरकारने बैठक घेतली. त्यातल्या पहिल्या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही. दरम्यान केंद्र सरकारने आणलेले हे कायदे जाचक आहेत असं म्हणत अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी त्यांना मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.