येस न्युज नेटवर्क । लव्ह जिहाद विरोधात उत्तर प्रदेशात नवीन अध्यादेश लागू करण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी बरेलीमध्ये या अध्यादेशातंर्गत पहिला एफआयआर नोंदवण्यात आला. या प्रकरणात आरोपी ओवैस अहमदला (२१) बुधवारी अटक करण्यात आली. हिंदू मुलीला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केल्याचा तसेच मुलीच्या पालकांनी धर्मांतरावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांना धमकावल्याचा ओवैस अहमदवर आरोप आहे.
आरोपी ओवैस अहमद मागच्या काही दिवसांपासून फरार होता. त्याच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर २८ नोव्हेंबरपासून पोलीस त्याच्या मागावर होते. आयपीसीच्या कलम ५०४, ५०६ आणि ‘विधि विरुद्ध धर्म संपरिवर्तन प्रतिषेध अध्यादेश 2020’ अंतर्गत त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. ओवैसचे एका हिंदू मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. मागच्यावर्षी ते पळून गेले. ओवैसला त्यावेळी अटक झाली होती. मुलीच्या वडिलानी त्याच्यावर अपहरणाचा आरोप केला होता. पण मुलीने तो आरोप फेटाळून लावला. एप्रिल महिन्यात मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे दुसरीकडे लग्न लावून दिले.