येस न्युज मराठी नेटवर्क । काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या सदस्यात्वाचा राजीनामा देत राजकारणापासून दूर गेलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत. परंतु आता त्या आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात शिवसेनेपासून करणार आहेत. सोमवारी त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं म्हटलं आहे. यापूर्वीपासूनच त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसंच शिवसेनेकडून विधान परिषदेसाठीही त्यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचं समोर आलं होतं.
राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सातत्याने धुसफुस सुरू असतानाच विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावांची यादी महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार १२ नावांची यादी बंद पाकिटात राज्यपालांना सादर करण्यात आली. यांपैकी एका जागेसाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून उर्मिला मातोंडकर यांची निवड करण्यात आल्याचं समोर आलं होतं.