येस न्युज मराठी नेटवर्क । स्टिव्ह स्मिथचं आक्रमक शतक आणि इतर फलंदाजांनी त्याला दिलेली उत्तम साथ या जोरावर सलग दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली आहे. सिडनीच्या मैदानावर दुसऱ्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३८९ धावांचा डोंगर उभा केला असून मालिकेत आपलं आव्हान कायम राखून ठेवण्यासाठी भारताला ३९० धावांची गरज आहे. स्टिव्ह स्मिथने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत १०४ धावांची खेळी केली. त्याला कर्णधार फिंच, डेव्हिड वॉर्नर, लाबुशेन, मॅक्सवेल यांनीही उत्तम साथ दिली. भारतीय गोलंदाजांनी सलग दुसऱ्या सामन्यातही निराशाजनक कामगिरी केली. भारताकडून शमी, बुमराह आणि पांड्याने १-१ बळी घेतला.
पहिल्या वन-डे सामन्याच्या तुलनेत भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतू बुमराह आणि शमीची षटकं सावधपणे खेळून काढत फिंच आणि वॉर्नर जोडीने खेळपट्टीवर आपला जम बसवला. यानंतर दोन्ही फलंदाजांनी पहिल्या सामन्याप्रमाणेच फटकेबाजी सुरुवात केली. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी फोडण्यात अपयशी ठरले. दोन्ही फलंदाजांनी आपली अर्धशतकं पूर्ण केली. अखेरीस मोहम्मद शमीने कर्णधार फिंचला माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं, त्याने ६० धावा केल्या. यानंतर ठराविक अंतराने डेव्हिड वॉर्नरही जाडेजाच्या गोलंदाजीवर चोरटी दुहेरी धाव घेत असताना श्रेयस अय्यरच्या अचूक फेकीमुळे धावबाद झाला. वॉर्नरने ७७ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ८३ धावा केल्या.
यानंतर मैदानावर आलेल्या स्टिव्ह स्मिथने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत फटकेबाजीला सुरुवात केली. दोन विकेट घेतल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय संघाला स्मिथने पुन्हा एकदा बॅकफूटला ढकललं. मार्नस लाबुशेनसोबत स्मिथने तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत स्मिथने चौफेर फटकेबाजी केली. ६४ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने स्मिथने १०४ धावा केल्या. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर स्मिथ शमीकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर लाबुशेनने मॅक्सवेलच्या साथीने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला त्रिशतकी धावसंख्या गाठून दिली. यादरम्यान लाबुशेनने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. ४९ व्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर ७० धावा काढून तो माघारी परतला. नवदीप सैनीच्या अखेरच्या षटकात मॅक्सवेलनेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं, त्याने नाबाद ६३ धावा केल्या.