येस न्युज मराठी नेटवर्क । तपास यंत्रणांनी सत्व गुंडाळून मालकाचे आदेश पाळायचे ठरवले तरी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार टिकून राहिल, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. सामनातील रोखठोक या आपल्या सदरातून त्यांनी हे भाष्य केलं आहे.
राऊत म्हणाले, “भाजपाचे स्वतःचे व इतर मिळून ११२ आमदार असूनही त्यांना विरोधी बाकांवर बसावं लागलं. त्यामुळे त्यांच्यादृष्टीने महाविकास आघाडीचं सरकार हे अनैसर्गिक सरकार आहे. हे सरकार लवकरचं पडेल असं भाकीतही त्यांनी केलं आहे. पण त्यासाठी गुप्त कारवाया आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांचा वापर आवश्यक आहे, हे त्यांना माहिती आहे. पण ईडी सारख्या संस्थांनी स्वतःचं सत्व गुंडाळून मालकाचे हुकूम पाळायचे ठरवले तरी राज्यातील सरकार टिकून राहिल असं मी जबाबदारीनं सांगतो.”
- कोणतेही सरकार नैसर्गिक किंवा अनैसर्गिक नसतं
कोणतंही सरकार नैसर्गिक किंवा अनैसर्गिक नसतं जोपर्यंत ते टिकून आहे तोपर्यंत ते नैसर्गिक न्यायाचंच असतं. विधानसभेत या सरकारने बहुमत सिद्ध केलं आहे. त्यामुळे ते घटनेच्या चौकटीतच आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील ३७ भिन्न विचारांच्या पक्षांचं एनडीए सरकार पाच वर्षे चालवलं होतं. ते सरकार कुणाला अनैसर्गिक वाटलं नाही. महाराष्ट्रावर कोविड, पूर, निसर्ग वादळ आणि लॉकडाउनसारखी संकटे आली नसती तर वर्षभरात राज्याचं चित्र बदलताना दिसलं असतं.