येस न्युज मराठी नेटवर्क । शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) पथक मंगळवारी सकाळी दाखल झाले. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयामध्ये ईडीचे पथकाने शोधमोहिम सुरु केली. प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेत त्यांची दीर्घ काळ चौकशी करण्यात आली. त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तीयाला अटक करण्यात आली. त्यामुळे, राज्यात भाजपा सत्तांतरासाठी ‘ईडी’चा वापर करून काही सत्ताधारी नेत्यांवर दबाव आणू पाहत आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. त्यानंतर आता संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्विट करत भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापे मारले होते. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात सरनाईक कुटुंब ईडीच्या रडारवर आहे. या कारवाईनंतर शिवसेनेकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे. ईडी आणि सीबीआय हे केंद्र सरकारच्या हातातील बाहुलं झालं आहे, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच एक व्यंगचित्र ट्विट केलं आहे. या व्यंगचित्रात दोन कुत्रे उभे आहेत. त्यातील एका कुत्र्यावर सीबीआय आणि दुसऱ्या कुत्र्यावर ईडी असे लिहिले आहे. ही दोन कुत्रे महाराष्ट्राच्या वेशीवर उभे आहेत. “थांब, आता नक्की कोणाच्या घरी जायचं आहे ते अजून ठरलं नाहीये”, असं सीबीआय असं लिहिलेला कुत्रा ईडी लिहिलेल्या कुत्र्याला सांगताना दिसत आहे.