येस न्युज मराठी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपानं सरकारवर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला. त्याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सामनाला दिलेली मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीही नाही,” असं टीकास्त्र फडणवीसांनी डागलं आहे.
मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले. पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच फडणवीस यांनी कंगना रणौत व अर्णब गोस्वामी प्रकरणावर भाष्य केलं. “राज्य सरकारला १ वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या या कार्यकाळाची प्रगती पुस्तिका म्हणजे काल सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने दिलेले दोन निकाल आहेत. सरकारी तंत्राचा मोठाच गैरवापर केला गेला. ही दमनकारी नीती आहे. हे दोन निकाल आल्यावर आता कुणावर कारवाई करणार हे आता स्पष्ट झाले पाहिजे,” अशी मागणी फडणवीस यांनी केली.
“एका वर्षात काय केले, पुढची दिशा काय, यावर मुख्यमंत्र्यांना सामनाच्या मुलाखतीत काहीच सांगता आले नाही. इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी कधी पाहिले नव्हते, ते संविधानाची शपथ सुद्धा विसरले. नाक्यावरील भांडणात करायची वक्तव्य वर्षपूर्तीला करायची? मुख्यमंत्र्याची मुलाखत मला वाटली नाही. खरं तर मुख्यमंत्र्यांची सामनामध्ये आलेली मुलाखत ही प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची नाही,” अशी टीका फडणवीस यांनी केली.