येस न्युज मराठी नेटवर्क : करोनानंतर झालेल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला ६६ धावांनी पराभव पत्करावा लागला. सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीवर चौफेर हल्ला चढवत ३७४ धावांचा डोंगर रचला. या आव्हानाचा पाठलाग कराताना भारताचे चार फलंदाज १४ षटकांत बाद झाले होते. पण त्यानंतर शिखर धवन आणि हार्दिक पंड्यांनी यांनी चांगली भागीदारी रचली. पण भारताचा पराभव मात्र ते टाळू शकले नाहीत.
ऑस्ट्रेलियाच्या ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात आश्वासक झाली नाही. जोश हेझलवूडने भारताला सुरुवातीला तीन धक्के देत त्यांचे कंबरडे मोडले. हेझलवूडने यावेळी पहिल्यांदा सलामीवीर मयांक अगरवालला २२ धावांवर असताना बाद केले. मयांक बाद झाल्यावर भारताचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीला आला होता. पण कोहलीला यावेळी २१ धावा करता आल्या. हेझलवूडच्या उसळत्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात कोहली बाद झाला. हेझलवूडच्या याच १०व्या षटकातील पाचव्या चेंडूवर श्रेयस अय्यरनेही आपली विकेट गमावली. श्रेयसने दोन चेंडूंमध्ये दोन धावा करत आपली विकेट गमावली. लोकेश राहुललाही यावेळी १२ धावांवर समाधान मानावे लागले.
भारताची १४व्या षटकात ४ बाद १०१ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि हार्दिक पंड्या यांची चांगली जोडी जमलेली पाहायला मिळाली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १२८ धावांची महत्वाची भागीदारी रचली आणि भारताच्या विजयाचा आशा पल्लवित झाल्या होत्या. पण ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पाने यावेळी धवनला बाद केले आणि संघाला मोठे यश मिळवून दिले. धवनने यावेळी १० चौकारांच्या मदतीने ७४ धावा केल्या. धवन बाद झाल्यावर काही वेळातच हार्दिकही बाद झाला आणि भारताच्या विजयाच्या आशा धुळीस मिळाल्या पंड्याचे शतक यावेळी १० धावांनी हुकले. पंड्याने यावेळी ७६ चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ९० धावांची खेळी साकारली.