येस न्युज मराठी नेटवर्क : कर्णधार फिंच आणि स्टिव्ह स्मिथ यांची धडाकेबाज शतकं आणि त्यांना डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी फटकेबाजी करत दिलेली उत्तम साथ या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन-डे सामन्यात ३७४ धावांपर्यंत मजल मारली आहे. आयपीएल गाजवणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. क्षेत्ररक्षणादरम्यान भारतीय खेळाडूंनी केलेल्या गलथान कामगिरीचा फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला. फिंचने ११४ तर स्मिथने १०५ धावांची खेळी केली.
कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रदीर्घ काळानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी मैदानावर उतरत असलेल्या भारतीय गोलंदाजांची तयारी या सामन्यातून उघड झाली. सुरुवातीला बुमराह, शमी यांचा नेटाने सामना केल्यानंतर फिंच आणि वॉर्नर या जोडगोळीने मैदानावर स्थिरावत धावांचा वेग वाढवला. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. अखेरीस मोहम्मद शमीने वॉर्नरला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाची जोडी फोडली. वॉर्नरने ६९ धावा केल्या. वॉर्नर माघारी परतल्यानंतर स्टिव्ह स्मिथने फिंचला उत्तम साथ देत भारताला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.
भारताच्या फिरकीपटूंनी स्मिथला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला खरा..परंतू तो यामध्ये फसला नाही. सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत स्मिथने भारतीय गोलंदाजीवर हल्ला चढवला. दुसऱ्या बाजूने कर्णधार फिंचने आपलं शतक साजरं केलं. परंतू बुमराहच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो यष्टीरक्षक राहुलकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने ११४ धावांची खेळी केली. चौथ्या क्रमांकावर आलेल्या स्टॉयनिसकडून कांगारुंना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतू चहलने त्याला भोपळाही न फोडता माघारी धाडलं. यानंतर मैदानावर आलेल्या मॅक्सवेलने आपली जबाबदारी पूर्ण करत फटकेबाजीला सुरुवात करत ऑस्ट्रेलियाला स्मिथच्या साथीने त्रिशतकी धावसंख्या ओलांडून दिली. शमीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मॅक्सवेलही माघारी परतला.
यानंतर लाबुशेनही फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात बाद झाला. मात्र यानंतर स्मिथने कॅरीच्या साथीने आपलं शतक झळकावत ऑस्ट्रेलियाला भक्कम धावसंख्या उभारुन दिली. मोहम्मद शमीच्या अखेरच्या षटकात स्मिथ बाद झाला. भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने ३ तर बुमराह-सैनी आणि चहल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.