सोलापूर : सामाजिक संदेश देऊन कर्माचे महत्त्व सांगणाऱ्या “नि:शब्द द्रौपदी’ हा लघुपट २९ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीनारायण थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.
महाभारताचे युद्ध झाले. युद्धाचे परिणाम काय होतील, हे श्रीकृष्णाला आधीच माहीत होते. परंतु प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार वागावे लागते, याचे विवेचन या लघु चित्रपटात करण्यात आले आहे. या लघुपटात श्रीकृष्ण द्रौपदीला मार्गदर्शन करताना दाखवले आहे.
जे काही घडले ते अपेक्षित नव्हते, असे म्हणत द्रौपदी श्रीकृष्णाकडे खंत व्यक्त करते. यावर श्रीकृष्ण म्हणतो, संसाररुपी मायाजाळात केवळ मनुष्य असा प्राणी आहे की, ज्याच्या दातात विष नसून त्याच्या शब्दात आहे. त्यामुळे बोळताना आपण शब्द जपून वापरले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात वावरताना आपले शब्द जपून वापरावेत. त्यामुळे तुमचे काम होईल, कारण तुमचे डाब्दच तुमचे कर्म बनून तुमच्यासमोर येत असतात याची आपण काळजी घ्यायला हवी. हा लघुचित्रपट पंधरा मिनिटांचा असून याची निर्मिती ज्योती संतोष उदगिरी यांनी केली आहे. दिग्दर्शन संतोष उदगिरी यांचे असून सहायक दिग्दर्शक म्हणून श्रीकांत संभारम यांनी काम पाहिले. शुभम गुंडला, साई दासी, वेणुगोपाल रेडी आणि प्रशांत यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. संगीत सँडी अद्दनिकी यांचे आहे.