मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनानं निधन झालं असून गुरुग्रामच्या वेदांता रुग्णालयात पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 71 वर्षांचे होते. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून अहमद पटेल यांची ओळख होती. साधारणतः महिन्याभरापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या वेदांता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु, अखेर मृत्यूशी असलेला त्यांचा लढा अपयशी ठरला असून पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा फैजल अहमद यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. अहमद पटेल यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.