येस न्युज मराठी नेटवर्क : करोना संकट अद्यापही पूर्णपणे टळलं नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाची लाट नव्हे, त्सुनामीची भीती असल्याचा इशारा दिला आहे. करोना टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी संकट टळलेले नाही सांगताना त्यांनी रुग्णसंख्या वाढत असलेल्या शहरांचं उदाहरण दिलं होतं. तूर्त तरी टाळेबंदी करण्याचा विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून मुख्यमंत्र्यांचीही इच्छा असल्याचं म्हटलं आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
“बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावणार असल्याचं,” राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. “लॉकडाउन लावण्यात येणार नसला तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येईल. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा केली जाईल. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
राजेश टोपे यांनी यावेळी लग्न समारंभात २०० नागरिकांची संख्याही कमी करणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसत्ताशी बोलतानाही राजेश टोपे यांनी करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा काही निर्बंध लागू करण्यासाठी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत लवकरच बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाईल असं सांगितलं होतं.