जोहान्सबर्ग : महात्मा गांधी यांचा वारसा दक्षि आफ्रिकेत चालवणारे पणतू सतीश धुपेलिया यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले. जोहान्सबर्गमध्ये रविवारी संध्याकाळी वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे वाढदिवसानंतर अवघ्या तीन दिवसात धुपेलिया यांची प्राणज्योत मालवली.
“माझे बंधू सतीश धुपेलिया यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून निमोनियाचे उपचार सुरु होते. रुग्णालयात कोरोना संसर्गानंतर निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झाले. रविवारी संध्याकाळी त्यांना कार्डिअॅक अरेस्ट आला” अशी माहिती त्यांची बहीण उमा धुपालिया-मेस्त्री (Uma Dhupelia Mesthrie) यांनी दिली.
कोण होते सतीश धुपेलिया?
सतीश धुपेलिया यांनी फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील मीडियामध्ये केलेले काम गाजले आहे. गांधी डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कामात त्यांनी मोठे सहाय्य केले होते. डर्बनमध्ये महात्मा गांधींनी हे कार्य सुरु केले होते. धुपेलिया हे 1860 मध्ये स्थापन झालेल्या हेरिटेज फाऊंडेशनच्या मंडळाचे सदस्यही होते. सर्व समाजातील गरजूंना मदत करण्याबद्दल सतीश धुपेलिया यांची ख्याती होती. ते बर्याच समाज कल्याण संघटनांमध्ये कार्यरत होते. धुपेलियांच्या निधनाचा धक्का बसल्याने निकटवर्तीयांनी शोक व्यक्त केला आहे.