येस न्युज मराठी नेटवर्क : मद्यपींची पार्टी रंगात आली आणि मद्य संपले की जुगाड केला जातो. मात्र, हा जुगाड जीवघेणाही ठरतो. रशियातील एका गावातील पार्टीत दारू संपल्यामुळे हॅण्ड सॅनिटायझर प्राशन केल्याची घटना समोर आली आहे. हॅण्ड सॅनिटायझर प्यायल्यामुळे सातजणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोघेजण कोमात आहेत.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार,रशियातील तातिन्सकी जिल्ह्यातील तोमतोर गावात ९ जण पार्टी करत होते. पार्टीतील दारू संपल्यानंतर त्यांनी हॅण्ड सॅनिटायझर प्यायले. यामध्ये ६९ टक्के मिथेनॉल होते. यातील तीन जणांचा गावीच आधीच मृत्यू झाला. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तर, उर्वरित सहाजणांना एअरक्राफ्टमधून याकुत्स्क शहरात नेण्यात आले. त्यानंतर चार जणांचा मृत्यू झाला. तर, दोघेजण कोमामध्ये आहेत. फेडरल पब्लिक हेल्थ वॉचडॉग Rospotrebnadzor नुसार सॅनिटायझरमुळे विषबाधा झाली असल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रशियन सरकारने सॅनिटायझरन न पिण्याचे आवाहन केले आहे. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलशिवाय इतरही घटक असतात. हे घटक शरीराला अपायकारक ठरू शकतात. रशियात करोनाबाधितांची संख्या २० लाख ६४ हजारांहून अधिक झाली आहे. तर, ३५ हजार ७७८ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातही करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ५ कोटी ८० लाखांहून अधिकजणांना करोनाची लागण झाली आहे. तर, १३ लाख ८० हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, अमेरिकेत करोनाच्या संसर्गाचे थैमान कायम असून बाधितांची संख्या वाढत आहे. गुरुवारी अमेरिकेत एकाच दिवसात दोन हजार करोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. मे महिन्यानंतर ही आतापर्यंतची सर्वाधिक मृतांची संख्या असल्याचे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे. येणारे काही आठवडे अमेरिकेसाठी अधिक चिंताजनक असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.