सोलापूर : राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तत्पूर्वी सरकारने या वर्गांवरील शिक्षकांची कोरोना टेस्ट केली. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 178 शिक्षकांना कोरोना असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी संमतिपत्र द्यायला नकार देत मुलांना घरीच ठेवणे पसंत केले आहे. सोलापूर शहर- जिल्ह्यात सुमारे दीड हजार शाळांमध्ये सव्वालाख मुले नववी ते बारावीचे शिक्षण घेत आहेत. मात्र, आतपर्यंत 30 टक्केही पालकांनी संमतिपत्र दिलेले नाही. शिक्षण विभागाने 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले विषय शिक्षक व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागातर्फे ग्रामीणमधील आरोग्य केंद्र व नगरपालिका क्षेत्रातील केंद्रात 114 ठिकाणी चाचणीची सोय केली होती. शुक्रवारी व शनिवारी सर्वाधिक म्हणजे 10 हजार 799 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अँटिजेन चाचण्या केल्या. यामध्ये 176 शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील 3 हजार 406 शिक्षकांमध्ये लक्षणे दिसल्याने आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे.