येस न्युज मराठी नेटवर्क : नगरोटामधील चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केलेल्या चार दहशतवाद्यांचा सूत्रधार हा दहशतवादी अब्दुल रऊफ असगर हा होता. असगर हा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहर याचा भाऊ आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी बनावटीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
वायरलेस सेट, क्यू-मोबाइल सेट्स, डिजिटल मोबाइल रेडिओ आणि पाकिस्तानात उत्पादित असलेल्या वस्तूंचा समावेश आहे. हल्ल्याच्या उद्देशाने घुसलेले दहशतवादी हे पाकिस्तानमध्ये असलेल्या त्यांच्या सूत्रधाराच्या सतत संपर्कात होते. या घटनेनंतर पाकिस्तानचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे.
कलम ३७० च्या रद्द केल्यानंतर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने ( ISI) जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याचा भाऊ अब्दुल रऊफ याच्यावर काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी पुलवामा पेक्षाही मोठा हल्ला करण्याची जबाबदारी सोपवली आहे. या हल्ल्याच्या कटात आयएसआय, अब्दुल रऊफ असगर आणि काझी तारार सामील आहेत.
बहावलपूरमध्ये यासंदर्भात झालेल्या बैठकीत जैशच्या दहशतवादी नेटवर्कचे मौलाना अबू जुंदाल आणि मुफ्ती तौसीफही सामील होते. कट रचल्यानंतर जैश ए मोहम्मदच्या शकरगढ येथील शाखेला दहशतवाद्यांची निवड आणि प्रशिक्षण यासह अंतिम तयारी पूर्ण करण्याचं काम देण्यात आलं. चार दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ल्याचं प्रशिक्षण घेतलं आणि काश्मीर खोऱ्यात भारतीय चौक्यांना जास्तीत जास्त नुकसान पोहोचवण्यासाठी गोळीबाराचा सराव केला, असं सूत्रांनी सांगितलं.
जैशच्या दहशतवाद्यांनी भारतीय सीमे घुसखोरी करण्यासाठी सांबा सेक्टरमध्ये सीमेपलिकडील नाल्यांचा वापर केला. आणि जम्मूत कठुआ बाजूने सांबापासून सहा किलोमीटर अंतरावर जाटवालजवळ ट्रकमध्ये चढले. जैशने त्याच रात्री या भागात घुसखोरीही केली होती, असं सूत्रांनी सांगितलं.