स न्युज मराठी नेटवर्क : गेल्या काही दिवसांपासून सतत बैठकांच्या निमित्ताने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना करोनाची लागण झाली असून, त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात येणार आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे व त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. खुद्द खडसे यांनीही मी लवकरच यातून बरा होईन, असा विश्वास व्यक्त केला आहे.
एकनाथ खडसे यांना करोनाची लागण झाल्याचा वैद्यकीय अहवाल गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाला. मात्र, खडसेंची प्रकृती चांगली असून, कोणत्याही प्रकारचा धोका नको म्हणून त्यांनी मुंबईत उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे. खडसे गुरुवारी दुपारी जळगावात त्यांच्या मुक्ताई या निवासस्थानी असताना त्यांना वैद्यकीय चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. याच आठवड्यात आधी खडसेंच्या कन्या तथा जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे यांना करोना संसर्ग झाला होता. त्यांनी स्वतः आपल्याला करोनाची लागण झाली आहे, असे त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर तसेच ट्वीटर हँडलवर पोस्ट करत जाहीर केले होते. एकनाथ खडसे यांनीही आपल्याला करोनाची लागण झाल्याचे जाहीर केले आहे. गेल्या आठवडाभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली वैद्यकीय चाचणी करून घ्यावी, करोनाची लागण होऊ नये म्हणून इतरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील खडसेंनी केले आहे.