येस न्युज मराठी नेटवर्क : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भारतात पहिल्यांदाच आर्थिक मंदी आली असल्याचे राहुल गांधी यांनी गुरुवारी ट्विट करत म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची शक्ती कमकुवत केली आहे, असे टीकास्त्रही राहुल गांधी यांनी सोडले आहे.
भारतीय रिझर्व बँकेच्या अनुमानानुसार, वित्तीय वर्ष २०२०-२१ च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) आर्थिक विकास दर नकारात्मक राहिलेला आहे. जीडीपी दर दुसऱ्या तिमाहीत -८.६ टक्के इतका घसरला आहे. राहुल गांधी हे नोटाबंदी, लॉकडाउन आणि सरकारच्या इतर आर्थिक निर्णयांवर सतत बोलत आहेत.
त्यांनी नोटाबंदीला ४ वर्षे पूर्ण होत असताना मोदी सरकारचा हा निर्णय गरीबांवर प्रहार करणारा आणि भांडवलदारांना फायदा देणारा असल्याचे म्हटले होते. लॉकडाउनचा निर्णय देखील योग्य वेळी घेतला गेलेला नाही. या कारणामुळे मोठ्या प्रमाणात मजुरांनी स्थलांतर केले. याबरोबरच अर्थव्यवस्थेला जबर मार बसल्याचे त्यांनी म्हटलेले आहे.
करोनाच्या काळात लॉकडाउन आणि आर्थिक व्यवहार धिमे पडल्याने त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर स्पष्ट दिसत आहे. वर्ष २०२०-२१ मध्ये सुस्तावलेला आर्थिक विकास दराला २०२०-२१ च्या वित्तीय वर्षात मोठे नुकसान झाले आहे. विकास दराचे हे सुस्तावलेपण दीर्घकाळ सुरू राहू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सलग दुसऱ्या तिमाहीत वृद्धीदर नकारात्मक असेल असा अंदाज आहे.