महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा, 23 वर्षाखालील मुलांचा कर्नल सी के नायडू चषक सामना
तन्मोय व सत्यजित दास यांची संयमी अर्धशतके तर शुभम मेडचे 4 बळी.
सोलापूर : येथील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सुरू झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा ह्या 4 दिवसीय क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी खेळ थांबला तेंव्हा महाराष्ट्र संघाने त्रिपुरा संघाच्या पहिला डावाच्या 209 धावांच्या मोबदल्यात बिन बाद 47 धावा केल्या असून त्रिपुरा कडून सलामीचा फलंदाज तन्मोय दास व सत्यजित दास यांच्या संयमी अर्धशतकाचा समावेश आहे तर महाराष्ट्राच्या उत्कृष्ट गोलंदाज शुभम मेड ने 4 बळी मिळविले.
फलंदाजी साठी उत्तम खेळपट्टी असल्याचे पाहून पाहुण्या त्रिपुरा संघाने सकाळी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सलामीचे फलंदाज दीपजोय देब व तन्मोय दास यांनी अर्धशतकी सलामी दिली. 22 व्या षटकात शुभम मेड ने जोडी फोडताना देब (24 धावा 69 चेंडू) याला पायचीत केले. त्यानंतर आलेल्या सप्तजीत दास ने चेंडूगणिक धावा करण्याचे सूत्र अवलंबिले व त्याचे सोबत सलामीवीर तन्मोय ने 102 चेंडू मध्ये 3-3 चौकार, षटकार लगावत अर्धशतक साजरे केले आणि दास जोडगोळीने दुसऱ्या गड्यासाठी 52 धावांची भागीदारी रचली. जेवणाला खेळ थांबण्याच्या शेवटच्या षटकात स्वराज चव्हाण ने तन्मोय याला दिग्विजय पाटील करवी झेलबाद करत जोडी फोडली तेंव्हा 119 धावा (35.3 षटके) झालेल्या.
दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला आणि 30 धावांची भर घातली तेंव्हा मध्यमवती गोलंदाज अजय बोरुडे यांनी अर्धशतकवीर सत्यजित दास याला 54 धावांवरती सचिन धस करवी झेलबाद व 3 धावांच्या फरकात दुर्लभ रॉय याला देखील पायचीत केले. त्यानंतर आलेल्या आनंध भौमिक व अरिंदम बर्मन यांनी 35 धावांची भागीदारी केली असता शुभम ने दुसरा बळी मिळवला तो आनंध (12 धावा) याला पायचीत करत. चहापानाला खेळ थांबला तेव्हा त्रिपुरा संघ 196/6 (68 षटके) अशा स्थितीत होता. त्यानंतर मात्र शेवटच्या सत्रात तळातले फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले व त्रिपुराचा पहिला डाव 209 धावांवरती संपुष्टात आला. अरींदम बर्मन ने 31 धावा केल्या तर महाराष्ट्र कडून स्वराज चव्हाण 46/3 बळी, अजय बोरुडे 2 व किरण चोरमले 1 बळी घेतले.
महाराष्ट्राकडून पहिल्या डावाची सुरुवात हर्ष मोगावीरा आणि अनिरुद्ध साबळे यांनी करत दिवसा अखेरीला नाबाद 47 धावांची सलामी दिली. खेळपट्टीवर हर्ष मोगावीरा नाबाद 26 अनिरुद्ध साबळे नाबाद 17 धावांवरती खेळत आहेत. महाराष्ट्र संघाला दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी अद्यापि 163 धावांची गरज आहे व ती संघ उद्या किती गड्यांच्या मोबदल्यात घेतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

