सोलापूर – राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील एक जिल्हा परिषद व अकरा पंचायत समित्यांसाठी दिनांक 16 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.
काटेकोर नियोजन व समन्वय
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया अत्यंत काटेकोरपणे पार पडली. निवडणूक प्रशासनाने पोलीस विभागाशी समन्वय साधून प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात आवश्यक सुरक्षा व शिस्तबद्ध व्यवस्था केली होती. उपजिल्हाधिकारी महसूल संतोषकुमार देशमुख यांचा सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी तसेच पोलीस विभागाशी चांगला समन्वय होता.
अनुचित प्रकार टाळण्यात यश
या कालावधीत कोणत्याही कार्यालयात गडबड, गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडलेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवार व कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या वेळेचे काटेकोर पालन केले. शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली असली तरी सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली. शेवटच्या दिवशी कोणत्याही प्रकारे गर्दीवर नियंत्रण ठेवून गोंधळ होणार नाही याची दक्षता महसूल व पोलीस प्रशासनाने घेतली.
स्वतंत्र बैठक व मार्गदर्शक सूचना
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित अधिकारी यांनी स्वतंत्र बैठक घेऊन आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत शिस्तबद्धता व पारदर्शकता राखली गेली. यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल तथा ग्रामपंचायत निवडणूक शाखा प्रमुख संतोषकुमार देशमुख यांच्यासह सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक कामकाजाशी संबंधित अधिकारी यांची उपस्थिती होती.
शांततेत पार पडलेली प्रक्रिया
दिनांक 16 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत अर्ज विक्री व दाखल करण्याची संपूर्ण प्रक्रिया शांततामय वातावरणात पार पडली. उमेदवार, कार्यकर्ते व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदविला.

