शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास राष्ट्रीय पोषाखात व वेळेवर उपस्थित राहण्याचे आदेश
सोलापूर – भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रीय पोषाख परिधान करून वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
त्यानुसार, जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सकाळी 8.15 वाजता मा. जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. तसेच मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पोलीस परेड ग्राऊंड, पोलीस मुख्यालय येथे सकाळी 9.15 वाजता पालकमंत्री महोदय यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
सर्व शासकीय कार्यालयांनी सकाळी 8.30 ते 10.00 वाजेदरम्यान कोणताही अन्य ध्वजारोहण, शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करू नये. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
गणवेशधारक अधिकारी/कर्मचारी यांनी गणवेशात तर इतर अधिकारी/कर्मचारी यांनी शासन परिपत्रकानुसार राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच सर्व कार्यालय प्रमुखांनी अधिनस्त कर्मचारी व उपस्थित कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यासाठी एका कर्मचाऱ्याची नेमणूक करावी व त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी.
राष्ट्रीय ध्वज व राष्ट्रीय मानचिन्हाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही याबाबत कटाक्षाने दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, नियमभंग झाल्यास भारतीय ध्वज संहितेनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

