सोलापूर – मराठी भाषेची खरी ताकद तिच्या विविध बोलीभाषांमध्ये दडलेली असून, अनेक परकीय भाषांच्या प्रभावानंतरही मराठी भाषा टिकून राहून अधिक समृद्ध झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ भाषा अभ्यासक, प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग व भाषा संचालनालय आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत ‘बोलींचा जागर’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. महेंद्र कदम हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, राज्य शासनाचे भाषा अधिकारी डॉ. संजय पवार, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, भाषा व वाङ्मय विभागाच्या संचालिका डॉ. अंजना लावंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रातील ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. त्यानंतर विद्यापीठ परिसरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह वारकरी संप्रदायातील भाविकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. प्राचार्य डॉ. महेंद्र कदम आपल्या भाषणात म्हणाले की, मायबोली मराठी ही प्रत्येक प्रदेशातील बोलींमुळे समृद्ध होत गेली आहे. आज मराठी ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी बाराव्या–तेराव्या क्रमांकावर आहे. एआयच्या युगातही मराठी भाषा स्वतःला सक्षमपणे जुळवून घेत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाचे भाषा अधिकारी डॉ. संजय पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील विविध प्रांतांमध्ये मराठी वेगवेगळ्या बोलींमध्ये बोलली जाते. या बोलीभाषांचे जतन होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातूनच आपली सांस्कृतिक परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचते. याच उद्देशाने शासनातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत ‘बोलींचा जागर’ हा उपक्रम राबविला जात आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर म्हणाले की, मराठी भाषेचा इतिहास अत्यंत समृद्ध असून, तिच्या विविध बोलीभाषांमुळे आपली सांस्कृतिक ओळख ठरते. मराठीतील साहित्य व ग्रंथसंपदा इतर भाषांमध्ये अनुवादित व्हावी, यासाठी विद्यापीठात स्वतंत्र भाषांतर विभाग सुरू करण्याचा मानस आहे. तसेच हे ज्ञान डिजिटल माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमात डॉ. अभिमन्यू माने व डॉ. हेमंत गव्हाणे यांनी मराठीतील विविध बोलीभाषांवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्रा. नानासाहेब गव्हाणे यांनी संपादित केलेल्या ‘मायबोली मराठी दिनदर्शिका’ या प्रकाशनाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. अंजना लावंड यांनी केले. यावेळी मराठी भाषा विभागातील अजित पोवार, मुकुंद गोरे, नारायण जायभाये यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक व भाषा अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ :
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित ‘बोलींचा जागर’ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाप्रसंगी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, प्राचार्य डॉ. महेंद्र कदम, राज्य शासनाचे भाषा अधिकारी डॉ. संजय पवार, डॉ. अंजना लावंड आदी.



