सोलापूर सह राज्यभरातील 29 महापालिकांमध्ये शासनाकडून प्रलंबित असलेल्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार महापौर उपमहापौर यांच्या निवडी संदर्भाची पहिली सभा आयोजित केली जाणार आहे. विभागीय आयुक्तांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महापौर आणि उपमहापौर यांची निवड होईल. महापौरांची निवड झाल्यानंतर याच सभेत महापौर खुर्चीवर विराजमान होतील आणि नूतन महापौर हे स्थायी समिती आणि परिवहन समितीच्या सदस्यांची नियुक्ती करतील. भाजपचे 87 नगरसेवक आहेत. त्यामुळे स्थायी समितीवर जाण्यासाठी 14 नगरसेवकांना संधी मिळेल. एम आय एम चे आठ नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांचा एक आणि शिंदे सेनेचे चार नगरसेवक आहेत त्यामुळे त्यांचा एक असे 16 स्थायी समितीचे सदस्य आणि परिवहन मध्ये भाजपचे 10, शिंदे सेनेचा एक आणि एमआयएमचा एक सदस्य पहिल्याच सभेत निवडला जाणार आहे. महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवकांना संधी मिळणार आहे. त्यामुळे संख्याबळाचा विचार करता भाजपचे नऊ आणि एम आय एम चा एक स्वीकृत नगरसेवक होणार आहे. पहिली सभा झाल्यानंतर एक महिन्याच्या आत स्वीकृत नगरसेवकांची निवड करावी लागते. त्यामुळे पाठीमागच्या दारातून थेट स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

