सोलापूर, दि.9: पक्षी सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निबंध, चित्रकला आणि छायाचित्र स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातून सुमारे 2500 निबंध, 400 छायाचित्रे स्पर्धेसाठी प्राप्त झाल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी आज दिली.
राज्य शासनाच्या वन विभागामार्फत 5 नोव्हेंबर 2020 पासून पक्षी सप्ताह आयोजित केला जात आहे. पक्ष्यांबाबत जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने हा सप्ताह आयोजिला आहे. नागरिक आणि विद्यार्थ्यामध्ये पक्ष्यांबाबत आवड निर्माण व्हावी यासाठी निबंध, चित्रकला आणि छायाचित्रण स्पर्धा आयोजिल्या होत्या. या स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. निबंध स्पर्धेत सर्व गटात सुमारे 2500 निबंध प्राप्त झाले आहेत. छायाचित्र स्पर्धेत सुमारे 400 प्रवेशिका आल्या आहेत. यामध्ये घराच्या आसपास आढळणारे पक्षी यांच्या छायाचित्रणाचा जास्त समावेश आहे. अनेक उत्साही छायाचित्रकारांनी मोबाईलच्या सहाय्याने काढलेली छायाचित्रे पाठविलेली आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान पक्षी सप्ताहानिमित्त आयोजित पक्षी निरीक्षण कार्यक्रमास आज जिल्ह्यात ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. माळढोकसाठी प्रसिद्ध असलेल्या नान्नज पक्षी अभयारण्यात उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, परिवहन विभागाचे अधिकारी सतीश जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी आय.एच.शेख, व्ही.आर.नातु, वनपाल आर.डी.तुपे, वनरक्षक श्रीमती जे.एम. दाभाडे, पक्षीप्रेमी भरत छेडा, रेल्वे प्रबंधक संजीव अर्धापूरे, कल्याण साबळे, वनपाल चेतन नलवडे यांच्यासह पक्षी निरीक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.