सोलापूर, दि.9- विविध क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट दोन टक्के जागतिक संशोधक शास्त्रज्ञांच्या क्रमवारीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. विकास पाटील यांचा समावेश झाला आहे. विद्यापीठाच्यादृष्टीने ही आनंदाची व गौरवाची बाब असल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी म्हटले आहे.
प्रख्यात जर्नलच्या प्रसिद्ध झालेल्या संशोधनाच्या आधारे जगभरातील एक लाख सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांची यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केली आहे. त्यापैकी पहिल्या दोन टक्के सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांमध्ये भारतातील दीड हजार शास्त्रज्ञांचा समावेश आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणितशास्त्र, वैद्यकीय आदी विषयांमधील शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा यात अंतर्भाव करण्यात आलेला आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील डॉ. जॉन पीए इयालिडीस यांच्या पुढाकाराने 22 विज्ञान विषय आणि 176 उपविषयामध्ये संशोधन करणाऱ्या एक लाख सर्वोत्कृष्ट शास्त्रांची यादी बनविण्यात आली. यासंबंधीची माहिती पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स बॉयोलॉजी या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा दर्जा निश्चित करताना त्यांचे संशोधन कोणत्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. पेपरची संख्या, संशोधनाचा संदर्भ, शास्त्रज्ञांचे मानांकन आदी विविध निकष धरून ही यादी तयार झाली आहे.
या क्रमवारीतील अप्लाइड फिजिक्स या विषयातील संशोधनात प्रा. डॉ. विकास पाटील यांचा देशात 79 वा क्रमांक आहे. जगात अप्लाइड फिजिक्स या विषयात 3040 वा क्रमांक आहे. डॉ. पाटील यांच्या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे आदींनी अभिनंदन केले आहे.