सोलापूर : वारकरी परंपरेमध्ये “आषाढी कार्तिकी विसरू नका मज | सांगतसे गुज पांडुरंग || ” या उक्ती प्रमाणे वारी नित्य नेमाला खूप मोठे महत्व असून तो नेम निष्ठेने सांभाळला जातो. वारकरी भाविकांनी चैत्रवारी, रामनवमी, बीज, एकनाथ महाराज उत्सव, हनुमान जयंती,आषाढीवारी, श्रावण मास, अधिकमास,गणेशोत्सव, नवरात्र हे सर्व उत्सव शासन सूचना स्वीकारून साजरे केले. महामारी कोरोनामुळे कुणीही शासन विरोधात भूमिका घेतली नाही. शासनाला आत्ता पर्यंत सहकार्यच केले. परंतु सध्या बाजारपेठे सहित सर्व दुकाने खुली केली आहेत, चित्रपट गृह, नाट्य गृह, जिम सर्व सुरु झाले आहे. बससेवा पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे.
कोणतेच क्षेत्र खुले करण्याचे राहिले नाही. रुग्ण संख्या ही खूपच कमी होत आहे. त्यामुळे येणाऱ्या कार्तिक वारी मध्ये पारंपरिक दिंडी व पालखी घेऊन येणेसाठी किमान 50 भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी. पंढरपूर बाहेरून येणाऱ्या दिंडीला पंढरपूरमध्ये नगर प्रदक्षिणा करणेसाठी विशिष्ट कालावधी देऊन परवानगी द्यावी.
तसेच आळंदी येथील समाधी सोहळा, आळंदी नगर प्रदक्षिणा, त्या उत्सवातील पारंपरिक कार्यक्रम करणेसाठी परवानगी देऊन शासनाने दरवर्षी प्रमाणे नियोजन करावे. पंढरपूर ते आळंदी पायी जाणारे प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांची संख्या किमान 100 असावी.
तसेच सुप्रसिद्ध मंदिर व इतर मंदिर असे दोन भाग करून नियमावली तयार करावी. नित्यनेम करणेसाठी महाराष्ट्रातील सर्व इतर मंदिर खुली करून सुप्रसिद्ध मंदिर टप्प्याटप्प्याने खुले करून कीर्तन, भजन व काकडा आरती करणेसाठी नियम व अटी घालून परवानगी लवकरात लवकर जाहीर करावी अन्यथा आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी असे निवेदन अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे कडून ईमेलद्वारे मा.मुख्यमंत्री महोदयांना देऊन श्री सचिन ढोले साहेब प्रांत अधिकारी पंढरपूर यांना ही दिले.या मागणीसाठी मंडळाचे वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे स्मरण करून संत नामदेव महाराज व संत चोखामेळा महाराज यांना वंदन करून संत नामदेव महाराज पायरी समोर पंढरपूर येथे” भजन आंदोलन ” करण्यात आले. या आंदोलनास प्रातीनीधीक स्वरूपात पुढील पदाधिकारी उपस्थित होते. सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष ),बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव ), जोतिराम चांगभले (जिल्हा अध्यक्ष ), माऊली भगरे (जिल्हा सह अध्यक्ष ), नागनाथ नवले महाराज (जिल्हा सहअध्यक्ष ),मोहन शेळके (जिल्हा सचिव ), कुमार गायकवाड (शहर संघटक ), महेश चोरमुले, निवृत्ती मोरे, गोपाल कोकरे (शहर अध्यक्ष मंगळवेढा ), मल्लिकार्जुन राजमाने (शहर उपाध्यक्ष मंगळवेढा ),सतीश पाटील ( तालुका उपाध्यक्ष मंगळवेढा ), अजिंक्य मोरे, अभिमन्यु डोंगरे महाराज, आदी महाराज मंडळी हजर होती.