मुंबई : “राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करुन मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांचा हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार त्यांना निश्चितच महागात पडणार आहे”, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर केला आहे.
“राज्य सरकारने 2020-21 या शैक्षणिक वर्षातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे नोटिफिकेशन 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. याशिवाय मराठा आरक्षण EWS अंतर्गत देण्याचे आश्वासनदेखील दिले होते. मात्र, त्यांनी मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी SEBC प्रवर्गाचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही. इतर आरक्षित असलेल्या सर्व प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे, ही अतिशय धक्कादायक बाब आहे”
“अकरावी, इंजिनिअरिंग, मेडिकल अशा सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत. मराठा तरुणांचं भवितव्य अंधारमय होत चाललं आहे. मात्र बिनकामी राज्य सरकारला याची किंचितसुद्धा पर्वा नाही. राज्य सरकारच्या या धोरणांमुळे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही, हे सिद्ध होतंय”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.