सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील मारापूर येथे ग्रामीण पर्यटन केंद्र उभे रहावे अशी योजना सोलापूर सोशल फाउंडेशनने आखली असून त्याच्या तयारीसाठी दिनांक 10 नोव्हेंबर 2020 रोजी मारापूर येथे कृषी पर्यटन स्नेहसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
सोलापूर सोशल फाउंडेशनच्या नुकत्याच पार पडलेल्या संचालक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सोलापूर जिल्ह्यात कृषी पर्यटन आणि ग्रामीण पर्यटन केंद्रे उभी करण्यासाठी आणि त्यातून ग्रामीण तरुणांना रोजगार मिळावा यासाठी फाउंडेशचे प्रयत्न जारी आहेत. त्यामुळे बार्शी तालुक्यातील चुंब आणि पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या दोन गावांमध्ये अशी केंद्रे उभी राहत आहेत, सोशल फाउंडेशनने त्यांच्या विकासासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य करीत आहे आहे. आता मारापूर येथे असा प्रयत्न करण्यात येणार आहे.
फाउंडेशनच्या संचालक समितीच्या या बैठकीचे अध्यक्षस्थान फाउंडेशनचे अध्यक्ष आ. सुभाषबापू देशमुख यांनी भूषविले होते. लोकमंगल बँकेच्या कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीला फाउंडेशनचे संचालक अभिजित पाटील, पूर्वा वाघमारे, रवींद्र मिनियार, मुख्य समन्वयक विजय पाटील, समन्वयक विपुल लावंड, विजय कुचेकर यांची उपस्थिती होती.
सोशल फाउंडेशनच्या हरित ग्राम उपक्रमात 20१९-20 मध्ये सहभागी झालेल्या गावांचा सत्कार करून त्यांना प्रशस्ती पत्रक आणि सन्मान चिन्ह देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आणि पुढच्या वर्षीच्या हरित ग्राम उपक्रमासाठी आवश्यक त्या रोपांची लागवड करण्याबाबत नियोजन करण्यात आले.सोशल फाउंडेशनच्या मोफत अभ्यासिका आणि बुक बँक प्रकल्प सध्या तीन ठिकाणी सुरू असून त्यांची संख्या वाढवून प्रत्येक तालुक्यात एक अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे. या संबंधात या बैठकीत चर्चा करण्यात आली.
सोलापूर सोशल फाउंडेशनच्या अंतर्गत पुणे आणि डोंबिवली या दोन ठिकाणी सुरू असलेल्या अन्नपूर्णा योजनांचा आढावा घेण्यात आला. इतर कामांचा आढावा देखील घेण्यात आला. फाउंडेशनचे कार्य अनुभवण्यासाठी या बैठकीस मूळ सोलापूरकर असलेले केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे अतिरिक्त सचिव,माहिती व तंत्रज्ञान व मनुष्यबळ मंत्रालय भारत सरकार श्री वैभव कुमार अलदर सपत्नीक उपस्थित होते. सोलापूर सोशल फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा करीत या कार्यास योगदान देणार असल्याचे त्यांनी संगितले. फाउंडेशनतर्फे या उभयतांचा श्रीमंती सोलापूरची व सोलापूरचे चादर, टॉवेल भेट स्वरूपात देऊन सत्कार करण्यात आला.