येस न्युज मराठी नेटवर्क : आयपीएलच्या तेराव्या हंगामात प्ले-ऑफच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीकडून युवा खेळाडूंची निराशाजनक कामगिरी हा चिंतेचा विषय ठरते आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ, मधल्या फळीत ऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यरचं फॉर्मात नसणं संघाला चांगलंच महागात पडलंय. मुंबईविरुद्ध सामन्यातही या फलंदाजांनी पुरती निराशा केली. मधल्या फळीत ऋषभ पंतही फलंदाजीत आपली चमक दाखवू शकला नाहीये. धोनीचा उत्तराधिकारी म्हणून चर्चेला आलेला पंत आतापर्यंत निराशाच करत आला आहे. परंतू भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरच्या मते ऋषभ पंत कधीच धोनी होऊ शकणार नाही. प्रसारमाध्यमांनी त्याची धोनीशी तुलना करणं थांबवलं पाहिजे.
“प्रसारमाध्यमांना ऋषभ पंतची धोनीशी तुलना करणं थांबवावं लागेल. कारण, मीडिया जेवढं जास्त त्याची तुलना करेल तेवढा जास्त तो या गोष्टीचा विचार करत राहिल. तो महेंद्रसिंह धोनी कधीच बनू शकणार नाही. त्याला ऋषभ पंत म्हणून स्वतःची ओळख बनवावी लागेल. ज्यावेळी आपण धोनीबद्दल बोलतो त्यावेळी त्याचं नेतृत्व, फलंदाजी, यष्टीरक्षण अशा बऱ्याच गोष्टींची चर्चा होते. पण ऋषभ पंत फक्त चांगली फटकेबाजी करतो म्हणून त्याची धोनीसोबत तुलना होते, हे थांबायला हवं.” गौतम गंभीर ESPNCricinfo शी बोलत होता.