अभिनेत्री कंगना आणि तिची बहीण रंगोली यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावलं आहे. कंगना आणि तिची बहीण रंगोली यांना १० नोव्हेंबर रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे. कंगना आणि तिची बहीण रंगोली यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे समाजात दुहीचं वातावरण निर्माण झाला असा आरोप या दोघींवर आहे. या प्रकरणी या दोघींनाही उत्तर द्यायचं आहे. त्यासाठीच हे समन्स बजावण्यात आलं आहे.
कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली यांनी केलेल्या पोस्टमुळे हिंदू आणि मुस्लीम समाजात कलाकारांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी मुंबईतल्या वांद्रे कोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनी कोर्टात कंगनाचे काही ट्विट्स आणि तिच्या वक्तव्याचे व्हिडीओ सादर केले आहेत. या प्रकरणी कंगना आणि तिची बहीण यांच्याविरोधात ऑक्टोबर महिन्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता वांद्रे कोर्टाने कंगना आणि तिच्या बहिणीला समन्स बजावले असून १० नोव्हेंबर रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितलं आहे.
अभिनेत्री कंगनाने मध्यंतरी मुंबई आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे बराच वादही निर्माण झाला होता. शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगनामध्ये ट्विटर वॉरही रंगलं होतं. अनेक सिनेकलाकारांनीही कंगनाच्या या ट्विटचा निषेध केला होता. दरम्यान कंगना जेव्हा मुंबईत आली तेव्हा तिचं ऑफिस तोडण्यात आलं होतं. मुंबई महापालिकेने ही कारवाई केली होती.