मध्य रेल्वेचे तिकीट परीक्षक विशाल नवले यांनी २६.११.२०२५ रोजी वातानुकूलित लोकलमधील बनावट यूटीएस जनरेटेड सीझन तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पकडले.
मुंबई विभागाचे प्रवासी तिकीट निरीक्षक विशाल नवले यांनी १०.०२ च्या कल्याण–दादर वातानुकूलित लोकलमध्ये नियमित तपासणीदरम्यान एका महिला प्रवाशाला थांबवले. त्यांनी वातानुकूलित लोकलमध्ये अंबरनाथ –दादर मार्गावर प्रवासासाठी ११.१२.२०२५ पर्यंत वैध असलेले युटीस द्वारे निर्मित सीझन तिकीट युटीस क्रमांक X06YDZG055 दाखवले. सखोल तपासणी केल्यावर नवले यांना तिकीट संशयास्पद वाटले आणि त्यांनी तत्काळ त्याची पुष्टी मागितली. पडताळणीनंतर हे तिकीट मागील कालबाह्य तिकीटावरून बनवलेले बनावट तिकीट असल्याचे स्पष्ट झाले. प्रवासी गुडिया शर्मा यांना आवश्यक कारवाईसाठी शासकीय रेल्वे पोलीस/कल्याण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
त्यानंतरच्या तपासात असे दिसून आले की बनावट सीझन तिकीट तिचे पती ओंकार शर्मा यांनी तयार केले होते आणि ते तिला वापरण्यासाठी देण्यात आले होते. भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ (BNS) कलम ३१८/४, ३३६/२, ३३६/३, ३४० आणि ३/५ अंतर्गत फसव्या तिकीट पद्धतींमध्ये सहभागी असल्याबद्दल दोन्ही व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
विशाल नवले यांच्या सतर्कतेमुळे आणि तीक्ष्ण विचारसरणीमुळे बनावट तिकीट रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे ज्याची चौकशी सुरू आहे. कर्तव्याप्रती त्यांच्या समर्पणाने इतरांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
मध्य रेल्वे प्रवाशांना विनंती करते की, कृपया अधिकृत विक्रेत्यांकडून, रेल्वे स्थानकावरील बुकिंग काऊंटरमधून किंवा एटीव्हीएमद्वारे जारी केलेले वैध तिकिटे घेऊनच प्रवास करावा.
प्रवासी त्यांच्या मोबाईल फोनवर युटीस ॲप डाउनलोड करू शकतात आणि मोबाईल युटीस ॲपद्वारे तिकिटे बुक करू शकतात.
प्रवाशांना इशारा देण्यात येतो की, बनावट तिकिटे तयार करणे / मिळवणे किंवा त्यावरून प्रवास करणे यांसारख्या फसवणूक करणाऱ्या मार्गांचा वापर करू नये.
अशी कृत्ये भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत दंडनीय असून, दंड अथवा कमाल ७ वर्षांपर्यंतची कैद किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
