रसायनशास्त्र, सामाजिकशास्त्रे, संगणकशास्त्र पदार्थविज्ञान संकुलांची उत्कृष्ट कामगिरी!
सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षामार्फत (IQAC) 2022-25 या कालावधीतील बाह्य शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यांकनाचा अहवाल जाहीर करण्यात आला. या अहवालात विद्यापीठातील संकुले तसेच प्रशासकीय विभागांचे गुणांकन प्रसिद्ध झाले असून, रसायनशास्त्र, सामाजिकशास्त्रे, पदार्थविज्ञान आणि संगणकशास्त्र संकुलाने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विद्यापीठातील संकुले आणि विभागांचा शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन व मूल्यांकन केले आहे. तसेच विद्यापीठ विभाग फ्रेमवर्क रँकिंगचे मूल्यांकन मुंबईच्या डॉ. एम. एस. कुऱ्हाडे यांच्या समितीने केले आहे. सदर दोन्ही समितीचे मूल्यमापन व मूल्यांकन अहवाल जाहीर करण्यात आले. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते संकुल आणि विभागांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे आदींची पमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी केले.
विद्यापीठ कॅम्पस मधील एकूण 11 संकुलांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यापैकी रसायनशास्त्र आणि सामाजिकशास्त्रे संकुलानी प्रत्येकी 84 गुण मिळवत ‘उत्कृष्ट’ श्रेणी पटकावली. त्यानंतर संगणकशास्त्र संकुल (79 गुण), पदार्थ विज्ञान संकुल (76 गुण) आणि भूशास्त्र संकुल (75 गुण) या संकुलांनी चांगली कामगिरी केली. भाषा आणि साहित्य संकुलाला 69 गुणांसह चांगली श्रेणी मिळाली. आरोग्य विज्ञान संकुल, कला व ललितकला संकुल, जीवशास्त्र संकुल, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुल आणि स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी या पाचही संकुलांनी समाधानकारक कामगिरी केली आहे.
प्रशासकीय विभागांचेही मूल्यमापन करण्यात आले. यात सामान्य प्रशासन (कुलसचिव कार्यालय), शैक्षणिक व संशोधन विकास, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, वित्त व लेखा विभाग, ज्ञानस्त्रोत केंद्र, नवोन्मेष व इन्क्युबेशन, कौशल्य विकास, क्रीडा विभाग, विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि वैज्ञानिक उपकरण केंद्र या विभागांचा समावेश होता.
विद्यापीठ विभाग रँकिंग फ्रेमवर्क (UDRF) – 2024-25 च्या मूल्यमापनात पदार्थ विज्ञान संकुलाने प्रथम क्रमांक मिळवला, तर रसायनशास्त्र संकुलाने दुसरा क्रमांक पटकावला. सामाजिकशास्त्रे संकुलाने तिसरा क्रमांक मिळवला. सर्व संकुलांचे संचालक, विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी अभिनंदन करत विद्यापीठाच्या प्रगतीसाठी चांगले काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कुलसचिव डॉ शिवाजी शिंदे यांनी केले तर आभार सहाय्यक कुलसचिव अनिल जाधव यांनी मानले.

