स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीचे नेते प्रचारात सक्रिय दिसत नसल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. “लोकशाहीत घरी बसून राजकारण करता येत नाही. लोक आम्हाला आपोआप मतदान करतील, हा भ्रम चुकीचा आहे. जनतेत जाऊन मतांचा जोगवा मागावाच लागतो,” अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले आहे. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केले. तसेच अंजली दमानिया यांच्या आरोपांवर बोलणे टाळले.
प्रचारावरून मविआच्या नेत्यांना टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते प्रचारात का नाही? याची मला कल्पना नाही. निवडणुकांमध्ये जनतेमध्ये मतांचा जोगवा मागणे, यालाच लोकशाही म्हणतात. लोकशाहीमध्ये घरी बसून राजकारण करता येत नाही. लोक आम्हाला मतदान करतीलच असे कोणला वाटत असेल, तर ते अयोग्य आहे. जनतेमध्ये गेले पाहिजे. आमच्या परीने आम्ही जेवढे जनतेमध्ये जाऊ शकतो, तेवढे चाललो आहोत. ज्याला वाटते जनतेत गेले पाहिजे, ते जात आहेत. ज्यांना वाटत नाही, ते जात नाहीत. त्यामुळे मला त्यांच्यावर काही बोलायचे नाही.
सरकारी योजनांवर तिन्ही पक्षांचा हक्क
‘लाडकी बहीण’ योजनेचे श्रेय केवळ एका पक्षाचे नसून ते संपूर्ण महायुतीचे असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. लाडक्या बहिणींच्या नावाने महायुतीतील तिन्ही पक्ष मते मागत आहेत. मी मुख्यमंत्री असताना योजना सुरू झाल्याचे शिंदे म्हणाले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, “सरकारमध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित आहोत. स्थानिक पातळीवर काही नगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या युती असू शकतात, पण सरकारच्या योजना या कोणत्याही एका पक्षाच्या नसून त्या तिन्ही पक्षांच्या आहेत.”
दमानियांच्या आरोपांवर एका वाक्यात प्रतिक्रिया
पार्थ पवार यांच्या कंपनीच्या कथित जमीन व्यवहारावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अन्यथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, फडणवीस यांनी अवघ्या एका वाक्यात विषय संपवला. “अंजली दमानिया नक्की काय म्हणाल्या, हे मला माहीत नाही,” असे सांगत त्यांनी यावर अधिक प्रतिक्रिया देणे टाळले.
आपले संविधान जगात सर्वोत्कृष्ट
संविधानाचा गौरव यावेळी बोलताना फडणवीस यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विषद केले. “आपले संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे. या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला आवाज दिला असून, प्रत्येकाला आपले अस्तित्व टिकवण्याचा आणि स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार दिला आहे,” असे गौरवौद्गार त्यांनी काढले.

