मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे गेल्या आठ महिन्यांपासून मुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन बंद आहे. सध्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसह इतर काही लोकांनाच मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशातच लोकल लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी सर्वच स्तरांमधून केली जात आहे. आता सर्वांसाठी मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय येत्या काही दिवसांत घेण्यात येईल, असं ट्वीट मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. एका प्रवाशाच्या प्रश्नाला उत्तर देताना वडेट्टीवारांनी ट्वीट केलं आहे.
प्रवाशाच्या प्रश्नाला उत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट केलं की, ‘पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ. यासंबंधी चर्चा झाली असून मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल.’ सध्या मुंबई लोकल बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच लोकल लवकरात लवकर सुरु करावी यासाठी अनेक स्तरांतून मागणी केली जात आहे. त्यामुळे सरकार मुंबई लोकलसंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन, लोकल सर्वांसाठी कधी सुरु करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच वडेट्टीवारांनी प्रवाशाच्या ट्वीटला दिलेलं उत्तर हे लोकल लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत असल्याचं बोललं जात आहे.