अनैतिक संबंधातून अत्याचार करून पीडितेचा गळा आवळून खून करणाऱ्या माळशिरस तालुक्यातील वाफेगावच्या 28 वर्षीय तरुण शंकर दिगंबर सरवदे या गुन्हेगारास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल डी हुली यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.यात आरोपीला भारतीय दंड विधान कलम 302 नुसार दोषी धरून आजन्म कारावास व दोन हजार रुपये दंड.दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. शिवाय भारतीय दंड विधान कलम 201 नुसार तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड.दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा न्यायालयाने गुरुवारी सुनावली आरोपी शंकर सरवदे याचे फिर्यादीच्या नातेवाईकासोबत अनैतिक संबंध होते.यातूनच आरोपीने पीडितेला 2022 मध्ये परिसरातील शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिचा साडीने गळा आवळून खून केला.याप्रकरणी आरोपीविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड व सुनील जाधव यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.या प्रकरणी फिर्यादी, साक्षीदार व डॉक्टर यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी पक्षाने एकूण 15 साक्षीदार तपासले. या प्रकरणी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून फौजदार विजय जाधव, रियाज तांबोळी, पी एन भोसले यांनी काम पाहिले. सरकारी पक्षाकडून ॲडव्होकेट संग्राम पाटील, ॲडव्होकेट एस ए ढवळे, ॲडव्होकेट एस टी मेंढेकरी यांनी तर फिर्यादी कडून ॲडव्होकेट जी पी कदम यांनी काम पाहिले.

