येस न्युज मराठी नेटवर्क : माजीमंत्री वनाधिपती विनायक दादा पाटील यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत करोनावर उपचार सुरू होते. त्यातून बरे होऊन ते नुकतेच नाशिकला घरी परतले होते. अचानक प्रकृती ढासळून त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभलेला एक नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
विनायक पाटील यांचा जन्म १९ ऑगस्ट १९४३ रोजी निफाड तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. कुंदेवाडी गावचे सरपंच , निफाड तालुका पंचायत समितीचे सभापती, निफाडचे आमदार , विधान परिषदेचे सदस्य ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात उद्योग , सांस्कृतिक कार्य , क्रीडा व युवकसेवा या विभागांचे मंत्रीपद सांभाळले. अनेक सहकारी संस्थेत संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
वनशेतीतील योगदानाकरिता त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘ कृषीभूषण ‘ व ‘ वनश्री ‘ , भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी ‘ तसेच युनायटेड नेशनचा आउट स्टँडिंग फार्मर हा पुरस्कार त्यांना मिळाला होता . एफएक्यू व रोलेक्स पुरस्कार मिळविणारे ते पहिले व एकमेव भारतीय आहेत . त्यांना प्रतिष्ठित असा ‘ जमनालाल बजाज पुरस्कार’ही मिळाला होता.