अक्कलकोट – ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून एकूण १०६ कोटी ५८ लाख ६१ हजार ६८७ रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली असून, ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही येत्या दोन ते तीन दिवसांत रक्कम खात्यात जमा होणार असल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पाडव्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत दिली.
अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या १ लाख ३ हजार ७७९ इतकी आहे. त्यापैकी ९९ हजार ८०८ शेतकऱ्यांना शेतीतील नुकसान, १ हजार ४६९ जणांच्या घरात पाणी शिरल्याने बाधा, तर २ हजार ४७३ शेतकऱ्यांची घरे पडझडीत कोसळली आहेत. तसेच २९ जनावरे मृत्यूमुखी पडल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एकूण रकमेपैकी १०३ कोटी ६१ लाख १२ हजार १८७ रुपये शेती नुकसानभरपाईसाठी, १ कोटी ४६ लाख ९० हजार रुपये घरात पाणी शिरल्यामुळे, तर १ कोटी ४१ लाख ४२ हजार रुपये घर पडझडीसाठी वितरित होणार आहेत. याशिवाय मृत जनावरांसाठी ९ लाख १७ हजार ५०० रुपये मदत म्हणून मंजूर झाले आहेत.
या सर्व योजनांअंतर्गत सध्या ६१ हजार खातेदारांच्या याद्या ऑनलाइन अपलोड केल्या गेल्या असून, अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत सर्व शेतकऱ्यांना ही मदत पोहोचेल, असा विश्वास आमदार कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला.
अक्कलकोट मतदारसंघातील एकूण १ लाख १२ हजार ७५० हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते. विशेषतः बोरी, हरणा आणि भीमा नदीकाठच्या भागात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.
या सर्व परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने दोन हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनींसाठी नुकसानभरपाई निश्चित केली आहे. यानंतर एक हेक्टरपर्यंतची वाढीव मर्यादा लागू करण्याचा निर्णयही झाला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण तीन हेक्टरपर्यंत भरपाईचा लाभ मिळणार आहे. या निर्णयाचे स्वागत करताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या आयुष्यात दिलासा देणारा ठरेल.
अक्कलकोट तालुक्यातील नुकसानग्रस्त क्षेत्रात प्रशासनाने २४ तास कार्यरत राहून सर्व पंचनामे पूर्ण केले. महसूल विभाग, कृषी अधिकारी, ग्रामपंचायती आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे नुकसानभरपाई प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली असल्याचे आमदारांनी सांगितले.
अक्कलकोट तालुक्याला मिळालेली नुकसानभरपाई ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक रक्कम आहे, हे आमच्या क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे,असेही आमदार कल्याणशेट्टी म्हणाले.सरकारने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न केले, त्याचा खरा लाभ येत्या काही दिवसांत दिसून येईल.ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होत असल्याने ही दिवाळी त्यांच्या चेहऱ्यावर खरा उजेड आणणारी ठरेल, असे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेत माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, भाजप शहर मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील,माजी तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड,माजी शहराध्यक्ष शिवशरण जोजन आदी उपस्थित होते.

