सोलापूर — सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज अवंती नगर व यश नगर परिसरातील सहा कमानी व चौदा कमानी नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 6 कमान व 14 कमान येथे नाल्याचा प्रवाह वळवल्यामुळे त्या ठिकाणी परिसरातील शेतकरी व त्यांचे प्लॉट धारक आहेत त्यांना नोटीसा देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने त्यांना नोटीसा देण्यात आल्या त्यामध्ये उत्तमराव निकाळजे, सुधाकर चिट्ठ्याल, गंगाई सपाटे, रामचंद्र हत्तुरे, सुरेश सपाटे, मनोहर सपाटे, प्रसन्न निकाळजे, प्रशांत निकाळजे, सुधीर देशमुख, प्रवीण निकाळजे, उल्लावा निखळजे, पूनम निकाळजे, वर्षा कांबळे, विजय जानकर, मीनाक्षी जानकर, जयदेवी जानकर आणि शिवानंद धूम्मा या नागरिकांना नाल्याचा प्रवाह वळविणे अथवा नाल्यावर अतिक्रमण केल्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत.आज पाहणीदरम्यान आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी अवंती नगर परिसरातील ६ कमान आणि १४ कमान नाल्याच्या परिसरातील स्थितीचा तपशीलवार आढावा घेतला. त्यांनी संबंधित विभागाला नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या अनुषंगाने आज महानगरपालिकेकडून पोलीस बंदोबस्तासह ३ मोठे पोकलेन, ४ जेसीबी आणि ६ डंपर यंत्रणा तैनात करून रुंदीकरण व खोलीकरणाची कामे प्रत्यक्ष सुरू करण्यात आली आहेत.तसेच २५ पोलीस बंदोबस्त, ४० महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते. या ठिकाणी आयुक्तांनी स्वतः उपस्थित राहून कामाची पाहणी केली व कामाचा वेग कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या.या कारवाईदरम्यान उपायुक्त श्री. आशिष लोकरे, नगर अभियंता सारिका आकुलवार, किशोर सातपुते, विभागीय अधिकारी जावेद पानगल तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी मिळून नाल्यांच्या कामाची प्रगती तपासली आणि आवश्यक ठिकाणी तांत्रिक सुधारणा करण्याबाबत चर्चा केली.आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले की, “शहरातील सर्व प्रमुख नाले प्रवाही ठेवणे, त्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. नाल्यावर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल तसेच नाल्याचा प्रवाह रोखणारी कोणतीही कृती करू नये.”महापालिकेच्या वतीने नागरिकांना स्वच्छ व प्रवाही नाला व्यवस्थापनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.