शहीद पोलीस स्मृतीदिनानिमित्त पोलीस मुख्यालयात अभिवादन; वर्षभरात देशात 264 पोलीस शहीद
सोलापूर : कायदा सुव्यवस्था राखून शांतता ठेवत आणि प्रसंगी प्राणाची आहुती देत पोलीसांनी देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे. असे प्रतिपादन महानगर पालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी केले. 21 ऑ्नटोंबर राष्ट्रीय पोलीस शहीद स्मृती दिनानिमित्ताने पोलीस मुख्यालय येथे सकाळी 8 वा. अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, उपायुक्त दिपाली धाटे – घाडगे, बापू बांगर, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक राजाराम केंडे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
देशाला स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष झाले. स्वातंत्र्या नंतर देशात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी पोलीसांवर आली. सीमेवर सैन्यदल तर देशात पोलीसांनी आपल्या प्राणाची आहुती देत आपले कर्तव्य पार पाडत आहे. नक्षलवादी, माफिया आणि देशाचे शत्रू यांच्याशी लढत देशात शांतता ठेवण्याचे काम पोलीसांनी केले व करीत आहेत. देशात शांतता असेल तरच गुंतवणुक होते आणि गुंतवणुक झाली तरच नवीन रोजगाराची निर्मिती होते त्यातूनच देशाचा विकास होतो. म्हणूनच देशाच्या विकासामध्ये पोलीसांचे मोठे योगदान आहे. असेही मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले.
दि. 1 सप्टेंबर 2019 ते दि. 1 ऑगस्ट 2020 या एका वर्षात देशभरात विविध दलामध्ये कार्यरत असलेले 264 पोलीस आपले कर्तव्य पार पाडत असताना शहीद झाले. त्यामध्ये आंध्रप्रदेश 3, अरूणाचल प्रदेश 2, बिहार9, छत्तीसगड 35, हरियाणा 2, झारखंड 8, कनार्टक 17, मध्यप्रदेश 7, महाराष्ट्र 5, मणीपूर 2, पंजाब 2, राजस्थान 2, तमिळनाडू 3, त्रिपुरा 2, उत्तरप्रदेश 8, उत्तराखंड 6, पंश्चिम बंगाल 10, अंदमान निकोबार 2, दिल्ली 11, जम्मू आणि कश्मिर 12, आसाम 3, सीमा सुरक्षा बल 24, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल 7, केंद्रीय राखीव सुरक्षा बल 29, अग्निशामक दल 4, आयटीबीपी 18, एमएचए 9, रेल्वे सुरक्षा बल 14, एसएसबी 15 असे एकूण 264 पोलीस शहीद झाले. या सर्व शहीदांना अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी पाहुण्यांचे आगमन झाले त्यानंतर राष्ट्रीय पोलीस शहीद स्मृती दिनाच्या संदेशाचे वाचन पोलीस हवालदार मलकप्पा बनसगोळे, पोलीस हवालदार सागर मुत्तनवार यांनी केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक कैलास काळे, अजय जगताप यांनी शहीद पोलीसांच्या यादीचे वाचन केले. नंतर राखीव पोलीस उपनिरीक्षक भगवान टोणे यांच्या नेतृत्वाखाली शोक शस्त्र परेड करण्यात आली. सोलापूर शहर पोलीस, सोलापूर ग्रामीण पोलीस आणि राज्य राखीव पोलीस यांचा यामध्ये सहभाग होता. या तीन्ही दलाच्या वतीने हवेत तीन वेळा गोळीबार करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण पोलीसांच्या बॅन्ड पथकाने अभिवादन केले. नंतर प्रमुख पाहुणे मनपा आयुक्त शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, राज्य राखीव दलाचे समादेशक राजाराम केंडे यांनी स्मृती स्थंभाला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर उपस्थित असलेल्या शहीदांच्या परिवाराला पाहुण्यांची भेट घेतली. शेवटी 2 मिनिटे स्तभता पाळून अभिवादन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सकळे, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, अरूण फुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नाली देवकते यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच माजी पोलीस अधिकारी संघटनेचे पदाधिकारी आणि नागरीक उपस्थित होते.
264 शहीदामध्ये सोलापूरचा सुपुत्र…
आपले कर्तव्य पार पाडताना शहीद झालेल्या पोलीसांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील पुळूज येथील सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने हे गडचिरोली येथे कर्तव्य पार पाडताना शहीद झाले होते त्यांनाही यावेळी अभिवादन करण्यात आले.
21 ऑ्नटोंबर पोलीस शहीद स्मृती दिन….
देशाच्या सीमेवरील लडाखमध्ये इंडो तिबेटियन सीमा रेषेवर समुद्रसपाटीपासून 10 हजार 500 फूट उंचीवर बर्फाळ प्रदेशात दि. 21 ऑ्नटोंबर 1959 या दिवशी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांची एक तुकडी गस्त घालत असताना चीनच्या सैनिकांनी भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याला परतवून लावत असताना केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे 10 जवान शहीद झाले. म्हणून 21 ऑ्नटोंबर हा दिवस राष्ट्रीय शहीद पोलीस स्मृती दिन पाळला जातो. म्हणून दरवर्षी देशभरात कर्तव्य पार पाडताना शहीद झालेल्या पोलीसांना या दिवशी अभिवादन करण्यात येते.