सोलापूर : जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील 14 जणांचा आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये पंढरपुरातील 7 बार्शीतील 2 दक्षिण सोलापुरातील 1 माढ्यातील 4 जणांचा समावेश आहे.
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल 565 गावे बाधित झाली आहेत. यामुळे शेकडो घरात पाणी शिरल्याने हजारो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर साडेतीनशेहून अधिक जनावरे दगावली आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील 4 हजार 731 कुटुंबियांनी जिल्हा परिषद शाळा तसेच साखर कारखान्यांचा आसरा घेतला आहे. 16 हजार 954 नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. यावरून सोलापूर जिल्ह्यातील महापुराची भीषणता लक्षात येईल. पंढरपूर मधील दुर्घटनेत मृत्यू कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून घाट बांधणी कामाच्या ठेकेदारासह कन्स्ट्रक्शन कंपनीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे आदेश दिले आहेत.
महापुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग व एनडीआरएफ यांच्या वतीने युद्धपातळीवर मदतकार्य राबविले जात आहे महापुराचा धोका असलेल्या गावांमधील जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा, साखर कारखाना, समाज मंदिर आणि बाधितांच्या नातेवाईकांच्या घरी मठांमध्ये पूरग्रस्तांची व्यवस्था करण्यात आली आहे.