मुंबई ; सोलापूर शहर व जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांना अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, अपूर्ण पायाभूत सुविधा व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भेडसावत असलेल्या गंभीर समस्यांवर तातडीने उपाययोजना व्हावी, यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनात खासदार शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील नरखेड व सावळेश्वर महसूल मंडळातील शेतकऱ्यांची हाक ऐकवली. या मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या व घरांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. मात्र डिकसळ, मसले चौधरी व खुनेश्वर या गावांमध्ये प्रत्यक्षात ७० ते ७५ मिमी इतका पाऊस पडूनही पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांना व नागरिकांना मदत मिळाली नाही. त्यामुळे ६५ मिमीपेक्षा कमी पावसाच्या नोंदीची अट शिथिल करून सरसकट पंचनामे करण्याची मागणी खासदार शिंदे यांनी केली.
खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनात मांडलेले महत्त्वाचे मुद्दे असे :
१) अतिवृष्टीमुळे ज्यांची घरे पडझड झाली आहेत, त्यांचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी.
२) ज्या मंडळात ६५ मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद असली तरी प्रत्यक्षात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे, अशा ठिकाणी सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
३) सोलापूर शहरातील स्ट्रॉम ड्रेन लाईन सुधारण्यासाठी विशेष योजना तयार करून निधी द्यावा तसेच चुकीच्या नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह पूर्ववत करावा.
४) अमृत योजनेतील त्रुटीपूर्ण ड्रेनेज लाईनमुळे पाणी साचते, ती योग्य प्रकारे दुरुस्त करावी.
५) अतिवृष्टीमुळे वाहून गेलेले रस्ते, पूल, बंधारे व बँरॅकेट दुरुस्त करून वाहतुकीस सुरक्षित करावे.
६) अक्कलकोट तालुक्यातील शिरशी, मोटयाळ, संगोगी (बु) गावे स्थलांतरित करून पुनर्वसन करावे.
७) प्रत्येक बंधारा व पुलावर क्रॅशगार्ड बसविण्यात यावा.
८) कुरनुर धरणातून पूर्वसूचना न देता पाणी सोडल्याने गावांमध्ये झालेले मोठे नुकसान भरून काढावे.
९) संगोगी (बु) येथील बंधाऱ्याचे मोठे नुकसान दुरुस्त करावे; कारण तो शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी धोकादायक ठरत आहे.
१०) शिरशीवाडी तलाव कमकुवत झाल्याने तो कधीही फुटण्याचा धोका असल्याने तातडीने दुरुस्ती करावी.
११) पीएमजीएसवाय व सीएमजीएसवाय अंतर्गत झालेले निकृष्ट दर्जाचे रस्त्यांचे कामे दुरुस्त करून दोषींवर कारवाई करावी.
१२) मोदी वसाहतीतील रेशन दुकानातील तांदळात मृत साप आढळल्याने त्यावर गंभीर कार्यवाही करावी.
१३) गायरान जमीन गावठाणात रूपांतरित करावी. गावठाण जमीन उपलब्ध नसेल तर गायरान जमिनीवर घरकुल बांधण्याची परवानगी द्यावी. अनेक वर्षांपासून राहात असलेल्या घरांना नियमित करावे.
तसेच
सोलापूर शहरातील दरवर्षीच्या पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी तुंबण्याच्या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना व्हावी, यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदन सादर केले.
खासदार शिंदे म्हणाल्या की, “सोलापूर शहरात केवळ तीन तासांचा जोरदार पाऊस पडला तरी महानगरपालिका यंत्रणा कोलमडून पडते. नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरते, रस्त्यावर पाणी साचते आणि संपूर्ण शहराचे जीवनमान विस्कळीत होते. खरोखरच या शहराला वाली आहे का, असा प्रश्न आज नागरिकांना पडला आहे.”
त्यांनी निदर्शनास आणले की, महानगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन न केल्यामुळे दरवर्षी अशी भीषण परिस्थिती निर्माण होते. राज्यात व केंद्रात सत्ताधारी असतानाही नागरिकांना दिलासा मिळत नाही, ही शोकांतिका आहे.
खासदार शिंदे यांनी निवेदनात पुढील मुद्दे मांडले :
१) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सोलापूर महानगरपालिकेशी जोडून मलनिस्सारण वाहिनी सुयोग्य करावी.
२) अस्तित्वात असलेल्या स्ट्रॉम ड्रेन लाईन अद्ययावत कराव्यात.
३) अमृत योजनेतून झालेल्या ड्रेनेज लाईन कार्यान्वित करण्यासाठी दुरुस्त कराव्यात.
४) शहरातील १९ प्रमुख नाल्यांचे खोलीकरण व रूंदीकरण करण्यासाठी हाती घेतलेला ९९ कोटींचा प्रकल्प पारदर्शकपणे तडीस न्यावा.
५) स्मार्ट सिटी अंतर्गत सिमेंट रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने कमी इंचाच्या ड्रेनेज लाईन टाकल्यामुळे निर्माण झालेल्या समस्येचे तातडीने निराकरण करावे.
६) विश्वस्त मंडळ नसल्यामुळे महानगरपालिकेवर कोणताही वचक नाही; स्थानिक खासदार-आमदारांना विश्वासात घेऊन निधीचा नियोजनबद्ध वापर व्हावा.
७) नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह जिथे बदलला आहे तो पूर्ववत करावा.
८) नाल्यांवरील अतिक्रमण दूर करून तेथील रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे.
शिंदे यांनी सांगितले की, मागील काही दिवसांतील अतिवृष्टीमुळे सोलापूर शहर व लोकसभा मतदारसंघातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले, संसार उघड्यावर आले आणि रस्ते, परिसर पाण्याखाली गेले. स्मार्ट सिटी व अमृत योजनेतील त्रुटींमुळे ही परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लोकप्रतिनिधींना पूर्णपणे दूर ठेवून निधीचा मनमानी खर्च सुरू आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणले.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे प्रचंड अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाकडून तातडीने मदत मिळत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर येत आहेत. सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सर्वांना तातडीचे अर्थसहाय्य द्यावे आणि नुकसानभरपाईचे निर्णय त्वरीत घ्यावेत,” अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. खासदार शिंदे पुढे म्हणाल्या की, “शेतकऱ्यांच्या समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहेत. जर शासनाने योग्य उपाययोजना न केल्यास याचा थेट परिणाम संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या जनजीवनावर होईल.”
दरम्यान, खासदार शिंदे यांनी सोलापूर शहरातील पावसाळ्यातील बिकट परिस्थितीकडेही लक्ष वेधले. “केवळ काही तासांचा जोरदार पाऊस झाला तरी शहरातील नाले, ड्रेनेज लाईन व स्ट्रामड्रेन तुडुंब भरतात. घरामध्ये पाणी शिरते, रस्त्यावर पाणी साचते आणि नागरिकांचे जीवनमान धोक्यात येते. स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये झालेल्या चुका, अपुऱ्या ड्रेनेज लाईन आणि अतिक्रमणांमुळे ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे. यावर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले की, ड्रेनेज लाईन सुधारणा, नाल्यांचे जे खोलीकरण-रुंदीकरण, अतिक्रमणांचे निर्मूलन व पुनर्वसन, तसेच अमृत योजनेत झालेले कामे सुयोग्यपणे कार्यान्वित करणे, सोलापूर शहरातील ९९ कोटींचे १९ नाले रुंदीकरण व उंची वाढविण्याचा योजना महापालिकेने एकट्याने न राबविता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोबत घेऊन राबविण्यात यावा जेणेकरून नाल्याचे रुंदीकरण व उंचीकरण योजना योग्य रित्या होईल व त्याचा फायदा सोलापूर शहरातील नागरिकांना होईल. या बाबींसाठी तातडीचे आदेश द्यावेत. “अन्यथा सोलापूर शहर विकासाऐवजी समस्यांच्या विळख्यात अडकून राहील,” असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे सातलिंग शटगार, अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे, मा. नगरसेवक प्रवीण निकाळजे, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, संदीप पाटील, कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे, मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, मा. नगरसेवक किरणराज घाडगे, मंगळवेढा युवक अध्यक्ष रविकिरण कोळेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.