“कोरोना काळात इतिहासावरील युट्यूब व्हिडिओ तयार करताना सोलापुरातील अनेक मान्यवरांविषयी माहिती गोळा करण्याची प्रेरणा मिळाली. या संशोधनातूनच हे पुस्तक आकाराला आले,” असे प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी सांगितले.
प्रिसिजन फाउंडेशनच्या प्रिसिजन वाचन अभियान उपक्रमांतर्गत “सोलापूरचे शिल्पकार” या पुस्तकाचे लेखक डॉ. चंद्रकांत चव्हाण यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी घेतली. राधा देशपांडे व विभा अंबलगी या युवा प्रतिनिधी म्हणून पुस्तकातील काही भागांचे अभिवाचन केल. कार्यक्रमाच्या प्रारंभी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी या सर्वांचा सन्मान केला.
मुलाखतीतून सोलापुरातील अनेक महत्त्वपूर्ण पैलू उलगडले गेले. स्वातंत्र्यपूर्व काळात “साडेतीन दिवस पूर्ण स्वातंत्र्य अनुभवलेले शहर” म्हणून सोलापुराची ओळख असल्याचा उल्लेख करण्यात आला. पं. नेहरूंनी “शोलापूर” असा उच्चार करून शहराची वेगळीच नोंद घेतली होती.
अप्पासाहेब वारद यांनी भारतात पहिले स्वयंचलित नांगर आणून कृषीक्षेत्रात क्रांती घडवली. त्यांनी जपानमध्ये आडात पेढी सुरू केली होती, तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी त्यांना “पुण्यश्लोक” ही पदवी दिली होती.
त्याचप्रमाणे उद्योगक्षेत्रातील योगदान अधोरेखित करताना वालचंद हिराचंद शेठजी यांची आठवण करून देण्यात आली.
वैद्यकीय सेवेतून जागतिक ओळख मिळवलेल्या डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या कार्याचाही विशेष उल्लेख झाला. चीनमध्ये युद्धभूमीवर सेवा बजावलेल्या या मानवतावादी डॉक्टरांना तेथील जनतेने “सावळी आई” अशी उपमा दिली होती.
कामगार चळवळीच्या इतिहासात कॉम्रेड मीनाक्षी साने यांनी घडवून आणलेला पहिला विडी कामगार संप, हे सोलापुराच्या श्रमिक परंपरेचे महत्त्वाचे पान असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी नमूद केले.
पावसाचे वातावरण असूनही वाचक प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थितांना या निमित्ताने सोलापुराच्या समृद्ध इतिहासातील नवे पैलू जाणून घेण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन माधव देशपांडे यांनी केले.