येस न्युज मराठी नेटवर्क । सोलापूर शहर आणि जिल्ह्याला परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. शहरासह प्रत्येक गावातील रस्ते ओढे, नाले हे नदीप्रमाणे वाहू लागल्यामुळे अनेकांची घरे पाण्यात गेली आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून हजारो हेक्टर शेती आणि पिके पाण्याखाली गेली आहेत. जिल्ह्यातील भीमा, सीना, नीरा, बोरी, भोगावती, नागझरी, आणि हरणा या प्रमुख नद्या तुडुंब भरून वाहत असल्यामुळे नदीकाठची सुमारे 600 गावे या पुराने आपल्या कवेत घेतले आहेत. या पावसामुळे विठू रायाची पंढरी नगरी अक्षरशः महापुराने वेढली आहे.
बार्शी मोहोळ अक्कलकोट तसेच पंढरपूर या ठिकाणी मदत कार्यासाठी एनडीआरएफ तसेच महाराष्ट्र कमांडो यांनी मोठे मदतकार्य सुरू केले आहे. या पुलामुळे सुमारे पाच हजार कुटुंबातील 17 हजार व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. 14 व्यक्तींचा पुरामुळे मृत्यू झाला असून साडेतीनशेहून अधिक जनावरे या पुरामुळे वाहून गेले आहेत तर तेराशे घरांची पडझड झाली आहे. तब्बल 179 मार्ग बंद झाल्यामुळे अनेक गावचा संपर्क तूटला आहे. भीमा नदिने रौद्ररूप धारण केल्यामुळे आणि उजनीतून लाखो लिटर वेगाने पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या लोकांची झोप उडाली आहे.